महाराष्ट्र
मराठी माणसाचे प्रेम अनमोल,त्या प्रेमातच राहायचे आहे-आवाहन

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक,स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ,स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले.या स्वागत समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव,देश,धर्माकरता लढायला शिकवले,आपल्या संस्कृतीचा,भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले,ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली आहे”- देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री.
बृहन महाराष्ट्र मंडळ,स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही,मला या प्रेमातच राहायचे आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल.एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव,देश,धर्माकरता लढायला शिकवले,आपल्या संस्कृतीचा,भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले,ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याप्रसंगी बृहन महाराष्ट्र मंडळ,स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर,सेक्रेटरी किर्तीताई गद्रे,महेश बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते.