कृषी विभाग
वाकडी परिसरात ८० टक्के पिके पाण्यात
जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधी)
गेल्या महिन्यापासून सतत सुरु असलेल्या परतीच्या पावसाने राहता तालुक्यात धिंगाणा सुरु ठेवला असून वाकडी परिसरात सोयाबीन,बाजरी,मका,आदी ख्ररिप पिकांना धोका निर्माण झाला आहे तर ऊस या सारखे वार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे ८० टक्के पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सध्या सर्वत्र महिन्यापासून पाऊस सुरु असून वाकडी परिसरात अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे वाकडी परिसरात सुमारे ८० टक्के क्षेत्र गूडघाभर पाण्यात असून त्या पिकाचे नुकसान होणार आहे. डाळिंब फळबाग काही ठिकाणी काढणीस असताना सततच्या पावसाने या रानात पाणी साचल्याने तयार फळ गळून खाली पडत आहे या पिकांचे पंचनामे करण्याची गरज आहे-विठ्ठलराव शेळके,जिल्हाध्य्क्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
राज्यात परतीचा पाऊस ठाण मांडून बसला असून दैनंदिन होणाऱ्या पावसाने खरीप पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून जाण्याची चिंता निर्माण झाली आहे.जमिनीत भूजल पातळी काठोकाठ झाली असून असा पाऊस जवळपास सत्तर-पंच्याहत्तर वर्षात झाला नाही असे जाणकार सांगत आहे.गत दोन वर्षात पावसाने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहे.या नंतरही पाऊस असाच सुरु राहिला तर उर्वरित खरीप पिके नष्ट होतील. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता वाढली आहे.आधीच कोरोना आजारमुळे शेती व्यवसाय अडचणीत,कांदा निर्यात बंदी असताना आता सुरु असलेल्या सततच्या पावसाने हातात आलेले सोन्या सारखे पीक पाण्यात सापडल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे.बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणी केली आहे.पहिलेच डोक्यावर बँकेचे कर्ज असताना नवीन कर्ज काही शेतकऱ्यांना न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी उसनवर,सावकार या घटकांकडून कर्ज घेऊन खरीप शेती उभी केली मात्र त्यातून उभ्या केलेल्या सोनेरी पिकाचे पावसाच्या पाण्याने नुकसान होत असल्यामुळे काही शेतकरी कुटुंब अक्षरशः डोळ्यात पाणी आणत आहे.तेव्हा शासनाने त्वरित नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.