कृषी विभाग
खरिपाची होरपळ,शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात उसासह खरीप पीक क्षेत्र ५० हजार ७८६ हेक्टर असून एकूण लागवडीखाली टक्केवारी ९७.५ टक्के झाली असली तरी पावसाअभावी हे सर्व पिके धोक्यात आले असल्याने शेतकऱ्यांचे अवघे लक्ष आभाळाकडे लागले आहे.त्यामुळे आता खरीप पिके वर्तमानात अखेरचा श्वास मोजत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता लपून राहिली नाही.त्यातच जलसंपदा विभाग चाऱ्यांना पाणी सोडायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बंड केले तर नवल वाटायला नको.
“कोपरगांव विधानसभा मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.मतदार संघात पावसाने काही ठिकाणी २१ दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
अ.नगर जिल्ह्यात खरीपासाठी शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली होती.नांगरण,डोंगरण केले.बी-भरणाची व्यवस्था लावली होती.खरीप पिकांच्या भरवशावर पुढील आर्थिक गणिते मांडली होती,अ.नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे.सुरूवातीला जून महिन्यात पावसाने अवकृपा केली.जुलैमध्ये पेरणीसाठी पाऊस झाला तेवढया पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली त्यानंतर मात्र तो गायब झाला.त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले.अनेक हवामान तज्ज्ञ खोटे ठरले आहे.मधील काळात पावसाचा मोठा पडलेला खंड खरीप पिकांच्या मुळावर आला आहे.अ.नगर जिल्ह्यात सुमारे सरासरी क्षेत्र ०५ लाख ७९ हजार ७६८ हे.असून त्यातील ०४ लाख ८५ हजार ०६९ क्षेत्रावर पेरणी झाली असून सरासरी ती ८४ टक्के असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हे खरीप क्षेत्र ऐन पीक वाढीच्या अवस्थेत पावसाने खंड दिल्याने अडचणीत आले असून सोयाबीन या पिकाने मान टाकली आहे.सोयाबीन,मका,बाजरी,कपाशी आदी पिके पावसापाण्याअभावी सुकत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना घोर लागला आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उमेश धुमाळ यांचे जेऊर पाटोदा शिवारातील जळून चाललेले सोयाबीन पीक छायाचित्रात दिसत आहे.
“कोपरगावात नव्हे तर महाराष्ट्र भर काही ठिकाण वगळता पावसाने दडी मारल्याने अहिल्यानगर,नाशिक,औरंगाबाद विदर्भ या जिल्ह्यातील सोयाबीन सारखी पिके अक्षरशः जळून चाललेली आहेत,कोपरगाव तालुक्यात गोदावरी कालव्यांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाने सात क्रमांकाच्या फ़ॉर्मची अट लावली आहे.त्यामुळे होते नव्हते ती खरीप पिके हातातून निघून जाणार आहे”-उमेश धुमाळ,शेतकरी,जेऊर पाटोदा,ता.कोपरगाव.
दरम्यान जूनमध्ये अ.नगर जिल्ह्यात सरासरीच्या १०८.२ मिलिमीटरपैकी ५८.० मिलिमीटर म्हणजेच ५३ टक्के पाऊस पडला होता.जिल्ह्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ९०.८ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के पाऊस पडला होता.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात दि.०८ ऑगष्ट अखेर सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र २५,५९४ हे.तर त्या पाठोपाठ मका पिकाखाली १४,३७३ हे.कापूस १६७१.२० हे.बाजरी ९६७.२० हे.मूग १८१ हे.तूर ३२.४० हे.उडीद १५ हे.इतर कडधान्ये २३८.४० हे.ऊस ६५८ हे.चारा पिके ०५,हजार ०७५ हे.भाजीपाला पिके ४६८.७० हे.मसाला पिके-२९.४० हे.फळ पिके ०१ हजार ५५७.३८ हे.असे एकूण उसासह खरीप पीक क्षेत्र ५० हजार ७८६ हेक्टर आहे.एकूण लागवडीखाली टक्केवारी ९७.५ टक्के झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.
मात्र हि सर्व खरीप पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांना आता या पिकांचा घोर लागला असून बरीचशी हलक्या जमिनीतील पिके गेल्यात जमा झाली आहे.तर भारी जमिनीतील खरीप पीके कशीतरी तग धरून आहे मात्र ती फार काळ तग धरणार नाही असे दिसत आहे.त्यामुळे आगामी काळात पशुधन जगवण्यासाठी चारा पिके कशी वाचवायची हे खरे सरकारपुढे आव्हान निर्माण झाले आहे.