संपादकीय
तहसील कार्यालयाच्या आढावा बैठकांतील सार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांची सोमवार दि.२ नोव्हेम्बर रोजी सकाळी अकरा वाजता महावितरण,पारेषण,राज्य परिवहन आदी विभागांची आढावा बैठक तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित केली असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने कळविली आहे.व नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले असले तरी आज पर्यंत या आढावा बैठकांतून काय सार निघाले आहे हा कळीचा मुद्दा ठरतो आहे.
महसूल,पोलीस आणि त्या पाठोपाठ महावितरण,भूमिअभिलेख,जलसंपदा,सार्वजनिक बांधकाम विभाग हे जास्त टीकेचे धनी का होताना दिसतात याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.त्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.नुसता काळ्या पैशाचा सोस काही कामाचा नाही.हे अनेक बैठकामधून दिसून आले आहे.जनतेचे प्रेम आणि विश्वास हि खरी कमाई आहे.
कोपरगाव विधानसभेचे आ.आशुतोष काळे यांनी विविध विभागांचा आढावा घेण्याचा सपाटा लावला असून नागरिकांच्या विविध अडचणी जागेवरच सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.वर्तमानात कोरोना विषाणूने कहर केला असला तरी आता देश पातळीवर कोरोनाचा आलेख आता निम्याने खाली आला आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.त्यांनी निभावलेली भूमिका नक्कीच निर्णायक ठरली आहे.मात्र या बैठकीत मात्र एक लाख लोकसंख्येचे नेतृत्व करणारे नगरपरिषदेचे अध्यक्ष मात्र दिसत नाही याचा विचार नागरिकांपेक्षा राजकीय नेतृत्वाने करणे गरजेचे आहे.
कोपरगावात आता कोरोना चांगलाच थंडावला आहे.या कालखंडात सुरक्षित अंतर राखत आ.काळे यांनी जनतेचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठका घेण्याचा धडाका लावला आहे.सुरुवातीला निवळ प्रश्नांची सरबत्ती होत होती.मात्र त्याला अधिकाऱ्यांना प्रश्नाला उत्तर देणे बंधकारक नसल्याने त्याचे गांभीर्य नव्हते.मात्र उत्तरोत्तर होणाऱ्या बैठकीत त्यांनी त्यात सुधारणा करून नागरिकांच्या समस्यांना उत्तर देण्याचे बंधनकारक केल्याने त्याचा इष्ट परिणाम साधला गेल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आपण जे काही करतोय ते सर्व बरोबरच आहे या समजाला तडा गेला असून आपल्याला कोणी तरी या बाबत जाब विचारणार आहे याची जाणीव झाली आहे.त्यामुळे या आढावा बैठकातील गांभीर्य वाढले आहे.व आपल्या होणाऱ्या चुका किंवा जाणीवपूर्वक केलेल्या चुका याची किंमत आपल्याला चुकवावी लागणार आहे.याची शासकीय कर्मचाऱ्यांना जाणीव झाली असून त्याचा फायदा चुकांची पुनरावृत्ती होण्याचे टळणार आहे.आधी सर्वच विषय एकाच दिवशी घेण्याचा सोस होता त्याने अधिकचा गोंधळ मात्र झाला असल्याचे दिसून आले आहे.त्यात प्रश्नांची तड कमी लागत होती.ती बाब नागरिकांनी मागणी केल्यावर आ.काळे यांनी दुरुस्त केली हे बरे झाले आहे.व त्यात उगीच अहंकार आडवा येऊ दिला नाही हि बाब निश्चितच समाधानाची बाब आहे.मात्र या उलट गत पर्वात लोकप्रतिनिधींचा उलट अनुभव नागरिकांना येत होता.व आपण म्हणू तिकडूनच सूर्य उगवणार हा अट्टहास कोणाला कुठे घेऊन गेला हे नव्याने सांगण्याची गरज नाही.जनता,मतदार सूज्ञ आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.त्या मानाने पहिले वर्ष चांगले म्हटले पाहिजे.आ.काळे यांचा एक वर्षाच्या काळात कुठेही हात बरबटलेले दिसले नाही हि समाधानाची बाब आहे.सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व राजेंद्र खिलारी यांनी महसूल विभागातील भोंगळ कारभार उघड्यावर आणला त्यांना आता वळणावर आणण्याची जबाबदारी आमदार म्हणून काळे यांचेवर आहे.त्या बैठकीत तलाठ्यांनी उगीच पराचा कावळा केल्याचे दिसून आले आहे.व त्यांनी उगीच उद्योगाला आपल्या खांद्यावर बसवून घेतले आहे.प्रशासनाने आपण सेवेचा पगार घेतो याचे भान ठेवले की बाकी प्रश्न आपोआप सोपे होतात.महसूल,पोलीस आणि त्या पाठोपाठ महावितरण,भूमिअभिलेख,जलसंपदा,सार्वजनिक बांधकाम विभाग हे जास्त टीकेचे धनी का होताना दिसतात याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.त्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.नुसता काळ्या पैशाचा सोस काही कामाचा नाही.हे अनेक बैठकामधून दिसून आले आहे.जनतेचे प्रेम आणि विश्वास हि खरी कमाई आहे.अधिकारी किंवा कर्मचारी किती लोकाभिमुख आहे हे त्याच्या विश्वासावरूनच व तत्पर सेवेवरून कायम ध्यानात रहात असते व त्यातून त्यांची कीर्ती मात्र आयुष्यभर शिल्लक राहते याचे भान या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.तरच नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.अनेक अधिकारी किंवा कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कचाट्यात सापडतात हा नक्कीच योगायोग नाही.हि अधिकारी आणि तालुक्याला नक्कीच भूषणावह नाही.मृत किंवा आत्महत्या केलेल्या आपल्या भावाच्या चार्जशीटचे पैसे मागण्याच्या लालसेपोटी एक पोलीस आपले नोकरीसह सर्वस्व गमावून बसतो.तर दुसरा आपल्या तुटपुंज्या रकमेसाठी उगीच आपली आयुष्यभराची पुंजी गमावून बसतो याला काय म्हणावे आता तरी या लाचखोर कर्मचाऱ्यांनी आपले कुटुंब आणि आपली इभ्रत या साठी तरी डोके ठिकाणावर ठेऊन काम करावे इतके जरी झाले तरी बरेच काही कमावल्यासारखे आहे.हे काही आमदार यांनी जाहीर सल्ला देण्याचे काम नाही ज्याचे त्याने सुरक्षित अंतर राखून आपले भविष्य जपावे इतकेच.मात्र पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाच्या कारभाराचे आ.काळे यांच्याच गटाचे नेते कारभारी आगवन यांनी काढलेले वाभाडे हे नक्कीच सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले आहे.पंचायत समितीत शिवसेनेचा व भाजपचा प्रत्येकी एक सदस्य आहे.मात्र त्यांनी चार वर्षात एकही दिवस सत्ताधाऱ्यांना विरोध केल्याचे दिसले नाही.सगळे वाटून खाऊच्या भूमिकेत तर नाहीना इतका संशय यावा इतकी शांतता नक्कीच जनतेला न्याय देणारी वाटत नाही.याबाबत कोणालाही कधी प्रश्न पडल्याचे आठवत नाही.या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या चार वर्षाच्या कालखंडात पत्रकांरांना एकदाही बोलविण्याचे धाडस केले नाही.यातच त्यांच्या कारभाराचा पंचनामा आला असे म्हटले पाहिजे.त्यांनी जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नये.एका प्रतिष्ठित गणल्या गेलेल्या तहसीलदाराने या पूर्वी केलेले प्रताप या तालुक्याने या पूर्वी पहिले आहे.त्यांच्या कर्तृत्वाने आम जनतेला खाली मान घालावी लागली आहे.अनेकांनी दोन एकराचे बंगले येथेच बांधल्याचे या तालुक्याने पाहिले आहे.वाळूचा पैसा आणि काही विश्वस्तांचा मोठा कारभार मजल्यावर मजले चढत असले तरी ते या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय चढत नाही व तक्रारीनंतरही ते कसे कायम होतात हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.हाही या तालुक्यातील कळीचा मुद्दा ठरत आला आहे.या ठिकाणी बदली करून येण्यासाठी कोटी अर्धा कोटी वरिष्ठ पातळीवर देऊन येथे येणाऱ्यांनी जपून राहिलेले बरे.या पूर्वी रात्री तोंड काळे करून पळ काढून पळावे लागलेले अधिकारी या तालुक्याने पाहिलेले आहे.शिवाय गौरव प्राप्त करून सन्मानाने गेलेले अधिकारीही व आजही जनतेच्या समरणात राहिलेले अधिकारीही या तालुक्याने अनुभवलेले आहे.कोणत्या गटात समावेश करून घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.असे कोणी करू नये हे उत्तम.आजची बैठक त्यासाठीची पुढील चाचणी म्हणावी लागेल.