गुन्हे विषयक
कोपरगाव शहरात पोलिस अधिकाऱ्याचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेले राजू तुकाराम चव्हाण (वय-४२) रा.घुमटवाडी ता.पाथर्डी यांचा काळ रात्री ८.१५ वाजता हृदय विकाराच्या झटक्याने कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या समोर निधन झाले आहे.त्यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व मूळ घुमटवाडी ता.पाथर्डी येथील रहिवासी असलेले पोलीस नाईक राजू चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले त्याचे छायाचित्र.
स्व.राजू चव्हाण हे दोन वर्षांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात येथे रुजू झाले होते.त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात पंधरा वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलिसात केली होती.त्या नंतर त्यांनी आपले कर्तव्य अनेक ठिकाणी बजावले होते.ते दि.२६ एप्रिल रोजी रात्री ८.१५ वाजता आपल्या भाच्याला घेऊन घरी जेवणासाठी सोडून आपल्या दुचाकीद्वारे परत फिरले असता नवश्या गणपती मंदिर स्वामी समर्थ मंदिरासमोर या ठिकाणी त्यांची मान वाकडी होऊन त्यांनी आपला प्राण सोडला आहे.त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
दरम्यान या प्रकरणी खबर देणार प्रेमदास तारू पवार (वय-४५) रा.वागलूज ता.आष्टी,जिल्हा बीड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करित आहेत.
दरम्यान त्यांच्या निधनाने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,ए.सी.पवार,आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,आई,वडील असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.