गुन्हे विषयक
धाडसी चोरटे अखेर जेरबंद,मुद्देमाल हस्तगत,पोलिसांचे कौतुक

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणचे दोन ट्रॅक्टर चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असताना सदर चोरी संगमनेर तालुक्यातील कनोली येथील चोरटे हे तिऱ्हाइत व्यक्तींना फायनान्स कंपनीचे असल्याने भासवून विक्री करत असल्याची खबर शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना लागली असता त्यांनी विशेष पथक तयार करून आरोपी मंगेश सुदाम वर्पे याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे समजल्यावरून वर्पे व अतुल सखाराम घुले या दोन्ही भामट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दोन ट्रॅक्टर्स चोरी प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी करत असताना शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना गुप्त खबरीलाल इसमाकडून बातमी प्राप्त झाली होती त्यानुसार,मंगेश सुदाम वर्पे,अतुल घुले या दोघांना कनोली ता.संगमनेर येथुन जेरबंद केले आहे.त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.यात आरोपींना कोपरगाव प्रथमवर्ग न्या.भगवान पंडित यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातक गत जानेवारी महिन्यात ट्रॅक्टर चोरट्यांनी लागोपाठ ट्रॅक्टर्स चोरी करून खळबळ उडवून दिली होती.त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान यातील पढेगाव येथील फिर्यादी व कोपरगावचे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम रायभान चरमळ यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर अज्ञातच चोरट्यांनी चोरून नेला होता.त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५२/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान दुसरा गुन्हा याच पोलीस ठाण्यातील कोळपेवाडी येथे घडला होता.त्याच महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर महेंन्द्र दीपक कोळपे यांच्या मालकीचा १.७० लाख रुपये किमतीचा चोरट्यांनी हातोहात लांबवला होता.त्याबाबद त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५९/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी करत असताना शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना गुप्त खबरीलाल इसमाकडून बातमी प्राप्त झाली की,मंगेश सुदाम वर्पे या कनोली ता.संगमनेर येथील आरोपी हा सदर ट्रॅक्टर हे खाजगी वित्तीय कंपनीचे असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांना स्वस्तात विकण्याच्या प्रयत्नात आहे.
दरम्यान या बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपल्या गुन्हे पथकातील पो.हे.कॉ.इरफान शेख,पो.ना.अशोक शिंदे,कृष्णा पऱ्हे,यांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांना घटनास्थळी रवाना केले होते.त्यांनी घटनास्थळी सापळा लावला असता त्यात तथ्य आढळून आले होते.
त्यातील प्रमुख दोन आरोपी यांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.व त्यांच्या कडून अन्य दोन ट्रॅक्टरसह चार ट्रॅक्टर ताब्यात घेण्यास यश मिळवले आहे.त्यात दोन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यांची किंमत अनुक्रमे ०२.५० लाख,०१.७० लाख आहे.तर अन्य गुंह्यातील ट्रॅक्टर हा लाल रंगाचा स्वराज-७२४ ऑर्किड या कंपनीचा असून तो नाशिक ग्रामीण हद्दीतील असून त्या प्रकरणी पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाणे हद्दीतील असून त्याचा गुन्हा क्रं.२७८/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ या गुंह्यातील आहे.
तर चौथा गुन्हा हा संगमनेर तालुका पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तो हिरव्या रंगाचा ‘जॉन डियर’ कंपनीचा व ०४ लाख रुपये किमतीचा आहे.त्याचा गुन्हा क्रं.३३/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ असा आहे.त्यामुळे या गुंह्यातील एकूण जमा मुद्देमाल हा १२ लाख २० हजार रुपयांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान या आरोपींना आज कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्या.भगवान पंडित यांच्या समोर उभे केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यातील प्रमुख आरोपी मंगेश वर्पे हा ट्रॅक्टरसह अन्य वाहनाचा दलालीचा व्यवसाय करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यास दुसरा आरोपी अतुल घुले रा.घुलेवाडी हा मदत करत होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान या तपासात प्रमुख भूमिका निभावणारे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पो.हे.कॉ.इरफान शेख,पो.ना.अशोक शिंदे,कृष्णा कुऱ्हे,सायबर पोलीस ठाणे येथील पो.ना.फुरखान शेख,प्रमोद जाधव,गृहरक्षक दलाचे जवान अंकुश आहेर,मच्छीन्द्र गोर्डे आदिसंह तपासी अधिकारी पो.हे.कॉ.निजाम शेख,पो.ना.कोकाटे आदींचे कोपरगाव,संगमनेर तालुक्यातून कौतुक होत आहे.