गुन्हे विषयक
‘त्या’ महिलेचा खुनच,कोपरगाव तालुका पोलिसांनी दिला तपासाला वेग
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारातील गट क्रं.३६ मध्ये शेतातील एका पडक्या खोलीत अंदाजे वय २०-२५ वय वर्ष असलेल्या अनोळखी तरुणीचा गळा आवळून खून झालेला असल्याची माहिती प्राप्त झाली असून सदरची महिला हि कोपरगाव तालुक्यातील नसल्याचे उघड झाले आहे.तिचा अन्यत्र खून करून तिचे प्रेत घटनास्थळी आणून टाकले असल्याचा कयास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व्यक्त केला आहे दरम्यान आपण संबंधित आरोपीला लवकरच जेरबंद करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
घारी शिवारातील महिलेच्या शव विच्छेदनाचा अहवाल पोलीस अधिकाऱ्यांना नुकताच प्राप्त झाला असून त्यात सदर महिलेचा गळा आवळून खुन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घेऊन आपल्या तपासाची चक्रे जोराने फिरविण्यास सुरुवात केली आहे.पोलिसांपुढे या तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,घारी ग्रामपंचायत शिवारात गट क्रं.३६ मध्ये दौलत दामू होन यांचे शेतात पडकी खोली असून त्यात अनोळखी महिलेचे प्रेत दि.२४ एप्रिल रोजी दुपारी ०२.३० आढळून आले असल्याची पक्की खबर तालुका पोलिसांना मिळाली होती.सदर महिला हि अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वयाची असून तिचे प्रेत हे कुजलेल्या व फुगलेल्या स्थितीत मिळून आले आहे.हि खबर मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांनीं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.व प्रेत ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी साठी रवाना केले होते.
दरम्यान सदरचा अहवाल पोलीस अधिकाऱ्यांना नुकताच प्राप्त झाला असून त्यात सदर महिलेचा गळा आवळून खुन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेऊन शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घेऊन आपल्या तपासाची चक्रे जोराने फिरविण्यास सुरुवात केली असून नजीकच्या संगमनेर,राहाता,सिन्नर,येवला,वैजापूर,निफाड,श्रीरामपूर आदी पोलीस ठाण्यांना याची खबर देऊन घटनास्थळाची व सम्बधित महिलेची छायाचित्रे पाठवली आहे.तथापि अद्याप तरी सदर महिलेला कोणी ओळखलेले नाही.सदर महिला हि घारी,चांदेकसारे परिसरातील व कोपरगाव तालुक्यातील नक्कीच नाही हे सिद्ध झाले आहे.त्यामुळे आता पोलिसांची खरी सत्वपरिक्षा सुरु झाली असून या तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यू नोंद दप्तरी क्रं.२९/२०२२ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद केली होती.मात्र उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मात्र आता अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश आव्हाड हे करीत आहेत.