सण-उत्सव
शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे समताधिष्ठित समाजनिर्मितीस दिलेली चालना-प्रा.पवार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते.सर्वसामान्य रयत सुखी व्हावी या उद्देशाने त्यांनी अखंडपणे कार्य केले.त्यांचा राज्याभिषेक म्हणजे विषमतायुक्त समाज रचनेला दिलेला उभा छेद व रयतेची स्वप्नपूर्ती होती असे प्रतिपादन प्रा.किरण पवार यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध तसेच युरोपियन शक्तींशी संघर्ष करून रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले.इ.स.१६७४ मध्ये शिवरायांचा मराठा साम्राज्याचे ‘छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.त्या दिनास मोठे महत्व असून हा दिवस मराठी माणसासाठी प्रेरणादायी मानला जातो.कोपरगावात हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय मध्ये सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने ‘शिवस्वराज्य दिन’ आयोजित केला होता त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप होते.
या प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रा.पवार पुढे म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे तत्कालीन कालखंडातील प्रस्थापितांना जबर धक्का बसला.महाराजांच्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला गेला असल्याचे प्रतिपादन शेवटी केले आहे.
अध्यक्षीय विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.रमेश सानप म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही सामान्य जनतेला दिलासा देणारी घटना होती.महाराजांचे कर्तुत्व आजच्या पिढीने जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सूत्रसंचलन वासंती राऊत यांनी केले तर प्रा.महेश दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.