आरोग्य
कोपरगावात टाळेबंदी बाबत निर्णय घेण्याची गरज-नगराध्यक्ष

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरंगाव तालुक्यात नगरहुन तपासून काल आलेल्या अहवालात ०३ तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात २८ तर रॅपिड टेस्ट मधून ०२ असे एकूण ३३ रुग्ण बाधित आढळून आल्याने व सक्रिय रुग्णांची शतकी वाटचाल झाल्याने मागील कोरोनाचे विक्रम मोडीत निघाल्याने आता पुढील जीवित हाणीचे अनर्थ टाळण्यासाठी शहरात टाळेबंदीची आवश्यकता आहे का ? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच केले आहे.
“कोपरगावच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आठवड्यातून एक दिवस टाळेबंदी करायला हरकत नाही.व्यवसाय करण्याच्या वेळा कमी करूनही आपण स्वतःचा काही प्रमाणात कोरोनापासून बचाव करू शकतो.प्रत्येकास आर्थिक अडचणी असतातच,पण जीवितही महत्वाचे आहे.आतापासूनच आपण असे उपाय योजले तर अनेक दिवस टाळेबंदी करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही”.”असे कराच” असे आपण म्हणणार नाही”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
राज्यात कोरानानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच राज्यात आजही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात गेल्या २४ तासांत १३ हजार ६५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर नगर जिल्ह्यात आज अखेर ७८ हजार १८७ रुग्णांची नोंद झाली आहे.त्यात ०१ हजार ९४३ रुग्ण सक्रिय आहेत.तर ७५ हजार ०८२ रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत.तर आज अखेर ०१ हजार १६१ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहे.एकट्या कोपरगाव तालुक्यात ४८ नागरिकांना आपले जीवित गमवावे लागले आहे.त्यामुळे या साथीचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येणे गरजेचे आहे.दुसऱ्या टप्यात हि साथ नव्या जोमाने फोफावत आहे.त्यामळे हि बाब गंभीर मानली पाहिजे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे हे विधान आल्याने गांभीर्याने घेणे गरजेचे बनले असल्याचे मानले जात आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्याही धोकादायक वेगाने वाढत आहे.नागरिकांनी शासनाने वारंवार दिलेल्या सूचना,नियम अमलात आणणे गरजेचे आहे.मास्कचा वापर,वारंवार हात व परिसर स्वच्छ ठेवणे,सुरक्षित अंतर ठेवणे,गर्दि टाळणे,गर्दि होईल असे कुठलेही कार्यक्रम टाळणे,प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करण्याबाबत काहीजण अजूनही गंभीर नसल्यानेच कोरोना वाढतो आहे.खरे तर आपण-नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने आठवड्यातून एक दिवस टाळेबंदी करायला हरकत नाही.व्यवसाय करण्याच्या वेळा कमी करूनही आपण स्वतःचा काही प्रमाणात कोरोनापासून बचाव करू शकतो.प्रत्येकास आर्थिक अडचणी असतातच,पण जीवितही महत्वाचे आहे.आतापासूनच आपण असे उपाय योजले तर अनेक दिवस टाळेबंदी करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही”.”असे कराच” असे आपण म्हणणार नाही,सर्वांनी मिळून निर्णय घ्यायला हवा असे म्हणून सावध भूमिका घेतली आहे.कारण मागच्या वर्षी आम्ही असा प्रयत्न केला.त्यावेळी काहीजण गोरगरिबांचा फारच कळवळा आहे असे दाखविण्यासाठी आमच्यावर,प्रशासनावर टिका टिप्पणी करण्यात धन्यता मानू लागले.नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी सर्वजण मिळून निर्णय घ्यावा.प्रत्येक वेळी राजकिय विचार करू नये.आपल्यापैकी कुणावरही कोरोनाचे संकट कोसळू नये यासाठी लहान मोठ्या व्यापारी संघटना,सामाजिक संघटना,समाजसेवक,सर्वपक्षीय यांनीच निर्णय घ्यायला पाहिजे” असे आवाहन वहाडणे यांनी शेवटी केले आहे.