गुन्हे विषयक
शहाजापूर शिवारात सहा दरोडेखोरांची टोळी,दोघाना अटक,बाकी फरार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत सुरेंगावला जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दरोड्याचा तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला कोपरगाव तालिका पोलिसांनी आज पहाटे दिड वाजेच्या सुमारास तीन दुचाकींसह विविध हत्यारे असा एक लाख साठ हजारांच्या ऐवजांसह रंगेहात पकडले असून त्यातील निकेश सुरेश कोळेकर (वय-21) अजय संजय सावंत (वय-19) दोघेही रा.मोतीनगर सुरेगाव या दोघाना अटक करण्यात यश मिळाले असले तरी अद्याप चारजण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.त्यांचा तालुका पोलिसांकडून शोध जारी आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोळपेवाडी परिसरात एका सोनाराच्या दुकानावर साधारण दिड वर्षांपूर्वी दरोडा पडल्यानंतर सातत्याने चोऱ्यांच्या घटनांत वाढ झालेली होती.दुकान फोडीच्या घटना तर शंभरावर असताना बरेच जण गुन्हे नोंदविण्याचे टाळत होते.राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाकडे कालव्यावरून जाणाऱ्या लोखंडी पुलावरही लुटमारीच्या बऱ्याच घटना झालेल्या आहेत.मात्र भीतीपोटी नागरिक बोलावयास तयार नाही.आता अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता बोलली जात आहे.26 सप्टेंबरच्या दिवशी नागरिकांनी वैतागून गाव बंदचे आवाहन केले होते.मात्र पोलिसांनी मनावर घेतल्याने आता आरोपी उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यातील नाना मुळेकर याची वावी पोलिसांनी या पूर्वी चौकशी केल्याची माहिती आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,सध्या राज्यात विधानसभा निवडणुका सुरु असून त्यावर काळ्या पैशावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने तालुक्यात व मतदारसंघात पोलिसांची फिरती पथके तैनातीत ठेवली आहेत.आज पहाटे दिडच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलिसांचे गस्ती पथक कर्तव्यावर असताना त्यांना शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत देर्डे फाटा ते सुरेंगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांदूर मध्यमेश्वर उजव्या कालव्याच्या लगतच्या कच्च्या रस्त्यावर काही संशयित तरुण दिसून आले,त्याचे कडे कोपरगाव तालुका पोलिसांनी चौकशीसाठी आपला मोर्चा वळवला असता सदर दरोडेखोरांना गाडीचा संशय आल्याने त्यांनी धूम ठोकण्यास प्रारंभ केला त्यांचा तालुका पोलिसानी पाठलाग केला असता त्यातील निकेश कोळेकर व अजय सावंत या दोघा दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे तर बाकी संदीप शेषराव मुळेकर,नाना उर्फ लखन बापू मुळेकर,धरम बापू मुळेकर,नितीन रमेश मुळेकर, सर्व रा.मोतीनगर सुरेगाव ता.कोपरगाव आदी चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
दरम्यान ताज्या माहितीनुसार हे गुन्हेगार दिवसा बेंटेक्स दागिने विक्रीचा व्यवसाय करत असून त्याचे राहणीमान एकदम टापटीप असून कोणालाही संशय येणार नाही असा आहे.या दोन बुलेट चोरीतील असून एक सातपूर नाशिक येथील तर दुसरी कोपोंर्गाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांच्या कडून पोलिसांनी बारा इंची लांबीचा लोखंडी कोयता,एक 28 इंच लांबीचा लाकडी दांडा,34 इंच लांबीचा एक लोखंडी गज,अंदाजे सतरा फूट लांबीची सुती दोरी, अंदाजे शंभर ग्रॅम वजनाची कागदात गुंडाळलेली मिरची भुकटी,सत्तर हजार रुपये किमतीची एक रॉयल इनफिल्ड कंपनीची विना क्रमांकाची चॉकलेटी रंगाची बुलेट मोटार सायकल तिच्यावर पैलवान असे नाव लिहिलेली,तशीच अजून तशीच व त्याच किमतीची दुसरी काळ्या रंगाची बुलेट,तसेच काळ्या रंगाची विना क्रमांकाची वीस हजार रुपये किमतीची एक बजाज प्लॅटिना मोटार सायकल,असा एकूण एक लाख साठ हजार रुपये 180 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान घटना स्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे आदींनी भेट दिली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.नं.140/2019 भा.द.वी.कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.