गुन्हे विषयक
…या शहरात सेक्स रॅकेट,हॉटेल चालकांवर कारवाई !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी साईबाबा हे अंतर राष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले असताना पोलिसांकडून अभय मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर गुन्हे वाढले असून यात काल शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत,’हॉटेल साई वसंत विहार’ येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल करण्यासह तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली असून प्रमुख आरोपी शुभम आदमाने यास अटक केली असून त्याचा साथीदार नाना शेळके मात्र फरार झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या अपप्रवृत्तीस चाप बसणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.
श्री साईबाबामुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत दारू विक्रीसह अवैध व्यवसायास बंदी असतांना शिर्डी व परिसरात अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या अनेक घटना वारंवार उघड होत असतात.जिल्हाधिकारी अ.नगर यांनी पोलीस अधीक्षक व गुन्हा अन्वेषण विभागाला शिर्डी व परिसरातील अवैध दारू धंदे त्वरित बंद करण्याचे वारंवार आदेश द्यावे लागतात.अशीच घटना काल दि.०९ जुलै रोजी उघड झाली आहे.काही दिवस पोलीस अधिकारी अंग झटकल्याचे नाटक करतात ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या…’ अशी रीत सुरू होत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.अशीच घटना पुन्हा एकदा उघड झाली आहे.यात गंभीर बाब म्हणजे हॉटेल चालक आपल्या हॉटेलचा दुरुपयोग करून वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे.यात पोलिसांना खबर मिळाल्या नुसार त्यांनी ‘हॉटेल साई वसंत विहार’ या ठिकाणी कारवाईसाठी एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेल येथे पाठविला होता.तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीस सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याचे हॉटेलमधील मुली दाखवून बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.या बाबत पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होताच,’हॉटेल साई वसंत विहार’येथे छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले आणि वेश्याव्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाने (वय-२७) रा.कापूस वडगाव तालुका वैजापूर,जिल्हा छत्रपती संभाजी नगर,यास ताब्यात घेतली असून त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे.
दरम्यान वरील तीनही पीडित मुलींना पुढील कारवाई करिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांचे सोबत शिर्डी पोलीस ठाण्यात आणले आहे व वरील दोन्ही आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२४ स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम-१९५६ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सहायक पोलीस निरीक्षक कायदे,पोलीस हे.कॉ.इरफान शेख,अशोक शिंदे,दत्ता तेलोरे,बाबा खेडकर,पोलीस कॉ.गणेश घुले,पोलीस नाईक श्याम जाधव,महिला पोलीस कॉ.सविता भांगरे,पवार,श्री गोलवड,पोलीस कॉ.ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे.
दरम्यान या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी यात सातत्य का नाही अशी विचारणा नागरिकांनी पोलिसांना केली आहे.यात पोलिसांचे जे हॉटेल चालक त्यांचे हात ओले करतात त्यांचेवर मेहेरनजर होत असून ज्यांनी त्यास दाद दिली नाही त्याच्यावर कारवाई होत असल्याची जोरदार चर्चा शिर्डी शहरात सुरू आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.