गुन्हे विषयक
डिझेल चोरटा पकडला,नगर जिल्ह्यात सराईत टोळी सक्रिय !
न्यूजसेवा
सिन्नर-(प्रतिनिधी)
नाशिक -पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे रात्रीच्या वेळी पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या ट्रकच्या इंधन टाकीतून डिझेल चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.यावेळी मारुती डिझायर कार मधून आलेला चोरट्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला.अ.नगर जिल्ह्यातील सराईत इंधन चोरांची टोळी सिन्नर तालुक्यात सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय आहे.त्यामुळे वाहन चालकांत खळबळ उडाली आहे.
नांदुरशिंगोटे शिवारात एकविरा पेट्रोल पंप परिसरात मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.तुकाराम माचवे रा.काळेवाडी,पिंपरी चिंचवड हे त्यांच्या ताब्यातील मालवाहू ट्रक (क्र.-एम.एच.१४ बी.जे.१३३३) उभा करून ट्रक मध्ये झोपले होते.रात्री तीन वाजेच्या सुमारास मारुती स्विफ्ट डिझायर कार मधून आलेल्या दोघा चोरट्यांनी ट्रकच्या इंधन टाकीतून इंधन चोरले.हा प्रकार शेजारच्या हॉटेलमधील कामगारांच्या लक्षात आला.त्यांनी आरडाओरडा करत डिझेल चोरी करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र,यावेळी मारुती स्विफ्ट डिझायर कार मधून एक चोरटा पसार झाला.तर रितेश वसंत सदाफळ (२०) रा.कालीका नगर,शिर्डी ता.राहाता हा चोरलेल्या इंधनाच्या ड्रमसह सापडला.सुमारे वीस लिटर डिझेल या चोरट्यांनी इंधन टाकीतून चोरले होते.या चोरट्यास वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.सुमारे पाच ते सहा जणांची इंधन चोरणारी टोळी असल्याची कबुली पकडलेल्या चोरट्याने दिली. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या,हॉटेल,पेट्रोल पंपांच्या परिसरात पार्किंग केलेल्या वाहनांची डिझेल ते चोरी करतात.त्यासाठी आलटून पालटून स्कार्पिओ,बोलेरो,स्विफ्ट डिझायर यासारखी वाहने ते वापरतात.असेही या चोरट्याने सांगितले.पोलिसांनी फरार झालेल्या चोरट्याची माहिती त्याच्याकडून घेतली.संशयित कार व त्या चोरट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली.पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर हवालदार शैलेश शेलार याप्रकरणी तपास करीत आहेत.