आरोग्य
कोपरगावात कोरोना तपासणी सक्तीची करा-नगराध्यक्ष वहाडणे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कोरोना विरोधात नगरपरिषदेने गत वर्षीपासून मोठी मोहीम उघडलेली असताना या कोरोना तपासणीच्या पवित्र्य कार्यात काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळे निर्माण करत असून त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करून मोफत कोरोना तपासनीस सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“कोपरगावातही बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे.तथापि मृत्युदर मात्र विशेष वाढला आहे त्यामुळे नागरिकांत चिंता उपस्थित होणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठी कोपरगाव नगरपरिषद शक्य तो उपाययोजना करत आहे त्याला नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे.राज्यात आज एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगावातही बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे.तथापि मृत्युदर मात्र विशेष वाढला आहे त्यामुळे नागरिकांत चिंता उपस्थित होणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठी कोपरगाव नगरपरिषद शक्य तो उपाययोजना करत आहे.आरोग्य विभाग आपले प्राण हातावर घेऊन या लढाईत उतरला आहे.सध्या घरोघर रुग्ण तपासणी सुरु आहे.मात्र या मोहिमेला सहकार्य करण्याऐवजी काही विघ्नसंतोषी मंडळी आपले नाक कापून पालिकेला अपशकुन करण्याचा नादानपणा करत आहे.संपुर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारे,सर्वसामान्य जनता प्रयत्न करत आहे.प्रशासकीय यंत्रणा तर जीव धोक्यात घालून दिड वर्षांपासून कोरोना योद्धे बनूनच काम करत आहेत.याच प्रयत्नांत अनेकांचा बळीही गेलेला आहे.संपुर्ण देश कोरोनामुळे हैराण झालेला असतांना काहीजण मात्र जाणीवपूर्वक “कोरोना तपासणी व लसीकरण मोहिम ” हाणून पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत असा संशय यायला लागला आहे.आरोग्य विभाग व कोपरगाव नगरपरिषदही स्वखर्चातून प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांची तपासणी करण्याची मोहिम राबवत आहे.हीं तपासणी मोफत असूनही नागरिक मनापासून प्रतिसाद देत नाहीत असाच अनुभव येत आहे.अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत.पण असे अनुभवाला येत आहे कि काही ठराविक लोक हेतुपुरस्सर तपासणीसाठी यायला तयार नाहीत.इतरवेळी शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी रांगा लावणारे,लाभ घेणारे टेस्टिंग व लसीकरण करून घ्यायची टाळाटाळ करत आहे.आता शासनाने कठोर भूमिका घेऊन देशातल्या प्रत्येक नागरिकाला यासाठी सक्तीच केली पाहिजे.
तपासणी व लसीकरण करणाऱ्यानाच फक्त सर्व शासकीय योजनांचे लाभ दिले पाहिजेत.जे जे लोक शासकिय आदेश पाळणार नाहीत त्यांचे रेशन,पिवळे रेशन कार्ड,गॅस सबसिडी,पंतप्रधान आवास योजना,सर्व शासकिय अनुदाने,वेतन,आर्थिक लाभ बंद केले पाहिजेत.
मास्क वापरायचे नाहीत,कोरोना विरूद्धच्या मोहिमेला प्रतिसाद द्यायचा नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांचे लाड बंद करा.देशातील एक मोठा वर्ग असे नियमबाह्य व धोकादायक वर्तन करत असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल? राजकारण्यांनी सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना टेस्टिंग-लसीकरण सक्तीचे केले पाहिजे.मतांचा विचार न करता कायदे राबवा.अन्यथा अजून लाखो बळी गेल्याशिवाय राहणार नाहीत.शासकिय लाभ घ्यायचे-हक्क गाजवायचे पण कर्तव्य करायचे नाही हे चालूच देऊ नये असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.