आरोग्य
कोपरगावात कायदेभंग करणाऱ्यांवर कारवाई होईल-नगराध्यक्ष विजय वहाडणे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी
कोविड-१९ आल्यापासून आज पर्यंत कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस जीवावर उदर्भ होऊन कोरोना योद्धे म्हणूनच काम करत आहेत.अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने रुग्णालयात दाखल आहेत.त्यामुळे नागरिकानी दक्षता घ्यावी असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”काहीजण विलगीकरण कक्षात आहेत.शहरात किंवा तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचे अंत्यसंस्कारही नगरपरिषदेचे कर्मचारीच करतात.रात्री अपरात्रीही स्वतःच्या जीवाची,कुटुंबाची पर्वा न करता जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जाणीव नागरिकांनीही ठेवणे गरजेचे आहे.मास्क,सॅनिटायझरचा वापर,सुरक्षित अंतर व वेळोवेळी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.या महामारीच्या काळात तर स्वच्छता राखण्यासाठी जनतेने शहराचे आरोग्य सांभाळण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य केलेच पाहिजे.कोविड सेन्टरमध्येही हेच कर्मचारी कार्यरत आहेत.रुग्णांचे नातलगही रुग्णाजवळ जायला भीत असतांना आरोग्य कर्मचारी मात्र रुग्णांची मनापासून सेवा करत आहेत.डॉक्टर,नर्सेस,आशा सेविका,पोलीस विभाग,महसूल विभाग जनतेच्या काळजीपोटी धडपडत असेल तर नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य-जबाबदारी आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.नियम-कायदे भंग करणाऱ्यावर कारवाई होईल.कुणीही स्वतःला ” खास ” समजू नये व कारवाई होत असतांना अडथळे आणू नयेत.तरच आपण सर्वजण सुरक्षित राहणार असल्याचेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.