आरोग्य
कोपरगावात वटपौर्णिमेस प्रतिबंध,जमावबंदी लागू
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरामध्ये करोना बाधित रुग्ण आढळला आहे.शिवाय आज नेमकी वटपौर्णिमा आहे.त्यामुळे महिलांना या सणानिमित्त एकत्र येण्यास कोपरगावचे तहसीलदार योगेश चन्द्रे यांनी कलम 144 नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे.त्याच्या अनुषंगाने सर्व महिलावर्गाला तालुका प्रशासना मार्फत आदेश देण्यात येत आहे.
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.हा त्यामागील उद्देश आहे.
मात्र कोपरगावात काल एक महिला डॉक्टर कोरोना बाधित निघाल्याने कोपरगाव शहरातील संभाजी चौकाच्या नैऋत्येकडे काही भाग तातडीने रात्रीच बंद केला आहे.व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वटपौर्णिमा उत्सवास महिला गर्दी करतात हे पाहून तालुका दंडाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,”कोणीही महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घराबाहेर पडू नये. कोणत्याही ठिकाणी गर्दी होईल अशा प्रकारचे कृत्य करू नये. शहरांमध्ये कलम 144 लागू असल्याने त्याचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.अशाप्रकारे कुणीही महिला बाहेर पडलेल्या आढळल्या तसेच कलम 144 भंग करताना आढळल्या तर त्यांच्यावर ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या वटपौर्णिमे निमित्त घरामध्येच वडाची फांदी आणून त्याचे पूजन करून वटपौर्णिमा साजरी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. आतापर्यंत सर्व कोपरगावातील नागरिकांनी प्रशासनास अतिशय चांगले असे सहकार्य केलेले आहे त्यामुळे आपण सर्व महिलासुद्धा प्रशासनाला या बाबतीमध्ये सहकार्य कराल ही प्रशासनाची अपेक्षा आहे. तरी या आदेशाचे पालन महिलांनी करून प्रशासनास सहकार्य करावे आणि आजची वटपौर्णिमा घरातच साजरी करावी असेही शेवटी तहसिलदार चन्द्रे यांनी शेवटी म्हटले आहे.