आरोग्य
उत्तम नजर ही डोळ्यांच्या आरोग्यावर अवलंबून-डॉ.वाबळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तम नजर ही डोळ्यांच्या आरोग्यावर अवलंबून असते.सर्वसाधारण डोळ्यांचे आरोग्य किंवा डोळ्यांचे स्नायू वय वर्षं ४० पर्यंत चांगले असतात.डोळ्यांचे अनेक आजार नजरेवर परिणाम करत असल्याने त्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील नेत्ररोग तज्ञ डॉ.सोनल साबळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात,’स्टुडेन्ट मेंटोरिंग प्रोग्राम’ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘डोळ्यांची काळजी’ या विषयावर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी डॉ.साबळे या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा रोहमारे या होत्या.
सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,शोभा रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे,प्रा.डॉ.संतोष पगारे,डॉ.सुरेखा भिंगारदिवे,प्रा.रोहन यादव,प्रा.मुकेश माळवदे,प्रा.अजित धनवटे,प्रा.सोनाली आव्हाड,प्रा.स्वागत रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”प्रदूषण,धूळ,मातीमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडते.कमी वयात चष्मा लागतो,डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात,पापण्यांवर सूजही येते.डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असते.पापण्यांवर सूज येणे,डोकेदुखी यासारख्या आजारांचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढते आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणाईला स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.डोळ्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढले असल्याचे जाणवते.वेळेत लक्ष दिले नाही तर या समस्या अधिक धोकादायक ठरू शकतात.कम्प्युटर किंवा टी.व्ही.समोर आपण बसतो तेव्हा डोळ्यांवर जास्त ताण पडतो.या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे विद्युततरंग नाजूक डोळ्यांना हानी पोहचवतात.त्याने आपल्या मेंदूवरही तणाव येतो.अशातच डोळे येणे हि साथ अलीकडील काळात वाढली असल्याने त्यांची काळजी घेणे तर अधिकच क्रमप्राप्त ठरत असल्याचे आवाहन त्यानी शेवटी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.विजय ठाणगे यांनी केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वर्षा आहेर यांनी केले उपस्थितांचे तर आभार डॉ.रवींद्र जाधव यांनी मानले आहे.