आरोग्य
कोपरगाव शहरासाठी आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून नागरिकांना आजारावर वेळेवर उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे असून त्यासाठी जास्त लोकसंख्या असलेल्या कोपरगाव शहरातील भागासाठी आरोग्य वर्धिनीं केंद्र मिळावे यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहरातील गांधीनगर, दत्तनगर, हनुमाननगर,इंदिरानगर, गोरोबानगर या भागासाठी महायुती शासनाकडून आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
महाराष्ट्रात ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे.शहरी भागातील जनसामान्य,गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत,’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे स्थापित केली जाणार आहेत.शहरी भागातील एकुण लोकसंख्येपैकी साधारण १२ ते २० हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे,’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ आपला दवाखाना स्थापन केले जाणार आहेत.त्याअंतर्गत कोपरगावात गांधीनगर,दत्तनगर,हनुमाननगर,इंदिरानगर,गोरोबानगर येथे दवाखाना सुरु करण्यास हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील ज्या भागात अधिक लोकसंख्या आहे त्या भागासाठी आरोग्य वर्धिनी केंद्र मिळावे यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील गांधीनगर,दत्तनगर,हनुमान नगर,१०५ गोरोबा नगर या जास्त लोकसंख्या असलेल्या भागातील नागरिकांसाठी महायुती शासनाकडून आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मंजूर करून घेतले आहे.या आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये एक एम.बी.बी.एस.डॉक्टर,एक कर्मचारी परिचारिका,आरोग्य सेवक,एक परिचर आदी कर्मचारी असणार आहेत.आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असून कोपरगाव शहराची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाणार असून नागरिकांचा आरोग्यासाठी करावा लागणारा आर्थिक खर्च निश्चितपणे कमी होणार असल्याचे आ.काळे यांनी सागितले आहे.
कोपरगावात आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील गांधीनगर,दत्तनगर,हनुमान नगर,इंदिरा नगर,गोरोबा नगर या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.