कोपरगाव तालुका
कोपरगावात बंदला शत-प्रतिशत नागरिकांचा प्रतिसाद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनोपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला कोपरगावकर नागरिकांनी शत-प्रतिशत प्रतिसाद दिला असून शहरातील सर्व खाजगी संस्थाने व व्यापाऱ्यांनी आपल्या पेढ्या बंद ठेऊन आपली सुरक्षा आपल्यालाच करावयाची असल्याचे सकारात्मक संदेश दिल्याने कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आभार व्यक्त केले असून या पुढेही या आवाहनाला प्रतिसाद देऊन आगामी ३१ मार्च पर्यन्त कोपरगाव शहर आपल्याला कोरोना मुक्त ठेवावयाचे असल्याने या निर्णयाची गरज असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान या बाबत कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी या बंदला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त करून आगामी काळात याच निर्णयाची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतंच पुण्यात आणि मुंबईत आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४१ झाली आहे. त्यात मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात ४० कोरोनाबाधित रुग्ण आहेत.नुकतीच कोरोना संदर्भात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यात कोणतेही शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत. तर अनावश्यक गर्दी, प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.
दरम्यान कोपरगावच्या बंदचे आवाहन आम्ही हसतमुखाने स्वीकारले आहे.ती सर्वांची गरज आहे.मात्र हा बंद करण्यापूर्वी किमान चार ते पाच तास आधी कल्पना दिली असती तर व्यापाऱ्यांचे नुकसान टळले असते.तरी प्रशासनाची अडचण आम्ही समजू शकतो पंतप्रधानांच्या रविवारच्या जनता कर्फ्युमध्येही व्यापारी संस्थाने बंद ठेऊ ते जनहिताचे आहे-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष कोपरगाव व्यापारी महासंघ.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह ४१ रुग्ण असून एका वृध्द रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. उर्वरित ४० पैकी ७ रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून एक रुग्ण गंभीर आहे. तर ३२ जणांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत.रुग्णांमध्ये २८ पुरुष असून १३ स्त्रिया आहेत.त्यामुळे कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने कंबर कासली आहे.त्यांनी सर्व शहरे साथरोग नियंत्रण कायद्याखाली आणली आहेत.त्यात कोपरगावचाही समावेश आहे.त्या मुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी सुरु होऊन त्यात सर्व व्यापारी संस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता.
कोपरगावात नागरिकांनी आपली दुकाने बंद ठेवली मात्र रस्त्यावर अनेक नागरिक उभे असल्याचे दुर्दैवाने दिसून आले आहे.आपल्याला हे संकट दूर होईपर्यंत नागरिकांचा संपर्क एकमेकांपासून दूर ठेवावा लागणार आहे याचे भान असणे आवश्यक आहे-प्रशांत सरोदे,मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद
त्या प्रमाणे तहसीलदार योगेश चंद्रे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शहर बंदचे आवाहन केले होते.त्याला सकाळपासूनच नागरिक,व्यापारी व व्यापारी संघटना यांनी प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे शहरात कर्फ्यु असल्याचेच जाणवत होते.मात्र हा नागरिकांनी स्वतःहून केला आहे.हीच दूरदृष्टी नागरिकांना आपल्या हिताची म्हणून आगामी संकट निवारण होईपर्यंत ठेवावी लागणार आहे.