निवडणूक
शिर्डीत…या उमेदवाराची विजयी सलामी !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय प्राप्त करीत ०१ लाख ४४ हजार ७७८ मते घेऊन प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा ७०, हजार ५२१ मतांनी दारुण पराभव केला आहे.या निवडणुकीत ७० हजाराचे मताधिक्य घेऊन शिर्डी विधानसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आठव्यांदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.दरम्यान शिर्डीच्या या विखे थोरात यांच्या लढाईत थोरात यांचा पराभव झाला असल्याचे दिसून आले आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे निवडणूक निरीक्षक तसेच याप्रसंगी उपस्थित असलेले राजेंद्र विखे आदी मान्यवर दिसत आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राहता तालुका प्रशासकीय भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर व निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता सुरू झाली होती.त्यात एकूण वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी करण्यात आली त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी झाली सावळीविहीर कडील मतदान केंद्राकडून या मतमोजणी सुरुवात झाली पहिल्या फेरीपासूनच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी हजारा चे मताधिक्य मिळवत आघाडी घेतली होती.मत मोजणीच्या प्रत्येक फेरीमध्ये बेरजेंच्या मताची आघाडी घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभावती घोगरे यांना सर्वच्या सर्व फेऱ्यांमध्ये पिछाडीवर टाकले आहे.प्रत्येक फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मताधिक्यात मोठ्या संख्येने वाढ होत गेली शेवटच्या विसाव्या फेरीअखेर मंत्री राधाकृष्ण विखे यांना एकूण ०१ लाख ४४ हजार ७७८ मते मिळाली तर विरोधी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना ७४ हजार ४९६ मते मिळाली आहे.यामध्ये मंत्री विखे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रगती घोगरे या नवख्या महिला उमेदवाराचा पराभव करून त्यांना व घोगरे साठी राजकीय पाठबळ देणाऱ्या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा मोठा धक्का दिला आहे.या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेऊन सुद्धा डॉ.राजेंद्र पिपाडा यांना केवळ ०१ हजार ५१० मते मिळाली आहे.त्यांचे डिपॉझिट जप्त झाले असून त्यांच्यासह इतरही पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

दरम्यान शिर्डी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ.राजेंद्र पिपाडा यांना मतदार संघातील मतदारांनी प्रतिभाताई घोगरे यांच्या मत विभागणीचा फटका बसू शकतो ही शक्यता ओळखून सपशेल नाकारले आहे.
दरम्यान मतमोजणीत विखे यांचे मताधिक्य प्रत्येक फेरीनिहाय मोठ्या संख्येने वाढत होते तसा कार्यकर्ते बाहेर जल्लोष करीत होते स्वतः माजी खा.सुजय विखे मीडिया सेल मध्ये बसून राज्यभरातील निकाल बघत होते.शिर्डी मतदार संघात मोठ्या मताधिक्याचा विजय मिळवू व संगमनेर मध्ये महसूल मंत्री थोरात यांचा पराभव करू तसेच जिल्ह्यातून महाविकास आघाडीला सर्वत्र जबर धक्का देऊ याचा आत्मविश्वास असल्याचे ते सांगत होते.मंत्री विखे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करून फटाक्याची जोरदार आतिषबाजी केली आहे.डी.जे.च्या तालावर ठेका धरत मिरवणुकीने मंत्री विखे राहाता बाजार तळ येथे गेले वीरभद्र महाराजांचे दर्शन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी त्यांनी पुष्पहार अर्पण केला आहे.कार्यकर्त्यांनी माजी खा.सुजय विखे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे,डॉ.राजेंद्र विखे,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे,महानंदाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या सोबत सेल्फी काढत व मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विजयाच्या ‘टायगर अभी जिंदा है ” च्या घोषणा देत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला असल्याचे दिसून आले आहे.