कोपरगाव तालुका
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या कारखान्याकडून उपाय योजना
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
चीनमधून जन्माला आलेल्या कोरोना व्हायरस ने जगभरातील नागरिकांची झोप उडविली आहे. जगातील अनेक देशात नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून जगातील प्रत्येक देश कोरोना व्हायरसचा प्रसार होवू नये यासाठी उपाय योजना करीत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना विरुद्ध दोन हात करण्याची तयारी केली असून प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेतून व कारखाना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार योग्य त्या उपाय योजना केल्या असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.
कारखाना परिसरातील नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी कारखाना परिसरात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसची लागण होवू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती देणारे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. कारखान्यातील कर्मचारी व तसेच विविध कार्यालयातील कर्मचारी कामावर रुजू होण्यापूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या हातांना सॅनिटायझर लावले जात आहे. कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न घेता हजेरी रजिस्टरवर घेण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. कामावर असतांना कर्मचाऱ्यांनी समुहाने एकत्रित येवू नये. ज्या कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला आदी विकारांचा त्रास आहे त्या कर्मचाऱ्यांना चेहऱ्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी ठिकठीकाणी कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी कामावर येतांना शक्यतो आपल्या चेहऱ्यावर स्वच्छ रुमाल बांधावा अशा कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.कारखाना परिसरात सर्वत्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या असल्याची माहिती कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.