कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेची शासकीय कार्यालयाकडेच मोठी थकबाकी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेची आगामी आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून यात नागरिकांकडे वसुली आहेच पण सरकारी कार्यालयाकडे तब्बल ४३ लाख ७३ हजार ९४० रुपयांची मोठी थकबाकी दिसून येत असून यात तहसील कार्यालयाकडे संकलित कर व पाणी पट्टी अशी सर्वाधिक १८ लाख ०५ हजार ८०८ रुपये थकबाकी असल्याचे उघड झाले आहे.याबाबत शासकीय कार्यालयासोबतच सोबतच नागरिकांनी घरपट्टी,नळपट्टी,व्यवसायिक गाळे कर व शासकीय कार्यालय यांनी आपल्या कडील कर करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नुकतेच केले आहे.
“कोपरगाव नगरपरिषदेच्या या वसुली मोहिमेमध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत.सर्व पथक नियुक्त केलेल्या विविध भागांमध्ये नागरिक व व्यावसायिक यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना नळपट्टी,घरपट्टी,व्यवसायिक कर नगरपरिषद कार्यालयाकडे जमा करावे”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजामध्ये शहरातील मालमत्ता कर,पाणी पट्टी,व्यवसायिक व इतर आस्थापनेवर आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक कर रक्कमेची वसुली झाले नंतर त्या रक्कमेची शहरांमधील सोईसुविधा वाढवण्यासाठी उपयोग केला जातो.जर शहरातील नागरिकांनी आकारणी केले असलेला कर वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा केला नाही तर शहरातील नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या विद्युत,स्वच्छता,रस्ते बांधकाम,पाणी व इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला अडचणी निर्माण होत असल्याची माहितीही मुख्याधिकारी यांनी दिली आहे.
थकबाकीची प्रतिकूल परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच एकूणच दैनंदिन जीवनावर होत असतो ही बाब लक्षात घेऊन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरांमधील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी, व्यवसायिक गाळा धारकाची कर वसुलीची मोहीम सुरु आहे.
या मोहिमेमध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत.सर्व पथक नियुक्त केलेल्या विविध भागांमध्ये नागरिक व व्यावसायिक यांच्या कडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना नळपट्टी,घरपट्टी,व्यवसायिक कर नगरपरिषद कार्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.याबाबत कर वसुली कामकाजाचा दैनदिन आढावा मुख्याधिकारी घेवून या कामी सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणी बाबत त्यांना मागर्दर्शन करत असताना दिनांक २० फेब्रुवारी २०२२ अखेर कर वसुली स्थिती घर पट्टीची येणे बाकी ६ कोटी २८ लाख ६३ हजार ३०४ रुपये,तर पाणीपट्टी एकूण मागणी ६ कोटी २७ लाख ५५ हजार ९५४ रुपये,घरपट्टी एकूण वसुली २ कोटी २५लाख ७२ हजार ०१३ रुपये,तर पाणीपट्टी एकूण वसुल रुपये १ कोटी ७३ लाख ४५ हजार ८२४,या शिवाय घरपट्टी एकूण थकबाकी रुपये ४ कोटी ०१ लाख ४० हजार ३१०,तर पाणीपट्टी एकूण थकबाकी रुपये ४ कोटी ५२ लाख ८९ हजार ८४२ इतकी आढळली आहे.
नगरपरिषद हद्दीतील सर्व शासकिय कार्यालय यांना कर बिले देण्यात आलेले आहे.तसेच यापूर्वी दोन वेळा स्मरणपत्र दिलेले आहे.
शासकीय कार्यालय कर थकीत तपशिल पुढील प्रमाणे आहे त्यात शासकीय कार्यालयाचे नाव,संकलित कर,पाणी पट्टी एकूण कर दर्शविले आहे.
त्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय ५ लाख १५ हजार ६६६,१ लाख ७१ हजार ७०१,६ लाख ८७ हजार ३६७,तहसील कार्यालय १४ लाख १९ हजार ६८७,६१ हजार ८४३,१८ लाख ०५ हजार ८०८,सेक्रेटरी महसूल भवन १ लाख ६९ हजार ८७४,धान्य गोडावून १ लाख ४२ हजार ९८७,तहसीलदार निवास २ हजार ७६०,पंचायत समिती क्वार्टर ००,७ लाख २०हजार ९०१,७ लाख २० हजार ९०१,पोलिस ठाणे कार्यालय ६७ हजार ९०३,१लाख ०० हजार ६८२,१लाख ६८ हजार ५८५,पोलिस स्टेशन क्वार्टर-००,२ लाख ७१ हजार १९३,२ लाख ७१ हजार १९३,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग-४ हजार ०८०,६३ हजार २८२,६७ हजार ३६२,सब डिव्हिजनल ऑफिसर,इरिगेशन ७५ हजार ५२१,४लक्ष ८८ हजार १४८,५ लाख ६३ हजार ७०५,गोदावरी डावातट कालवा चाळ,रेल्वे स्टेशन रोड ३७ हजार २३४,००,३७ हजार २३४,तालुका कृषी अधिकारी द्वारा महामंडळ ४ हजार ४०१,००,४ हजार ४०१,एकात्मिक बालविकास योजना-२४ हजार ९३३,४ हजार १४४,२९ हजार ०७७,एकूण-२४ लक्ष ९२ हजार ०६४,१८ लाख ८१ हजार ८९४,४३ लाख ७३ हजार ९४०,आदींचा समावेश आहे.
याबाबत नागरिकांनी तसेच शासकीय कार्यालयानीं आपल्या कडील येणे बाकी असलेली सर्व कर रक्कम विहित वेळेत भरावी व प्रशासनाला सहकार्य करावे.कुठलीही कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू नये.तसेच आपल्याकडे येणाऱ्या कर वसुली पथकास योग्यते सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शेवटी केले आहे.