कोपरगाव तालुका
दलित वस्ती सुधार योजनेसाठी कोपरगावला ७ कोटी १३ लाख- आ. काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद अहमदनगर समाज कल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनुसुचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विविध विकास कामांसाठी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्याला ७ कोटी १३ लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतीच दिली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य काम करीत आहे. ग्रामीण भागाच्या विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून या प्रस्तावांचा वेळेवर होत असलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळत आहे-आ. आशुतोष काळे
आपल्या प्रसिद्धि पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि, कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य काम करीत आहे. ग्रामीण भागाच्या विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून या प्रस्तावांचा वेळेवर होत असलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळत आहे. मागील वर्षी दलित वस्ती सुधार योजनेसाठी मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून दलित वस्ती परिसरातील रस्ते, बंदिस्त गटार, पाणीपुरवठा, समाज मंदिर दुरुस्ती, सार्वजनिक शौचालय, रस्त्यांचे सुशोभिकरण करून त्यांना पिव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
मागील वर्षी समाज कल्याण विभागाकडे दलित वस्तीच्या विविध विकास कामांसाठी दाखल केलेले सर्वच प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये सत्तांतर झाल्यापासून दलित वस्ती विकासासाठी प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असून दरवर्षी या निधीमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षी दलित वस्तीच्या विकासासाठी ५ कोटी रुपये मिळविण्यात यश मिळाले होते. यावर्षी यामध्ये २ कोटी १३ लाख रुपयांची भर पडली असून कोपरगाव तालुक्याला मिळालेल्या ७ कोटी १३ लाख रुपये निधीमधून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कोपरगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातील वस्तीचा विकास होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या सहकार्याने कोपरगाव तालुक्यासाठी निधी मंजूर झाला असून या पुढील काळातील कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून यापेक्षाही जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.