कोपरगाव तालुका
नागरी वस्तीतील पाणी निघून जाण्यासाठी..हा उपाय करा-तहसीलदार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अतिवृष्टी झाल्यानंतर कोपरगांव तालुक्यातील विविध गावांतील नागरी वस्तीमध्ये पाणी साचण्याची समस्या उदभवत असल्याचे निदर्शनास आले आहे.या समस्येवर कायमस्वरूपी पद्धतीने तोडगा काढण्यासाठी पाणी निघून जाण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी ग्रामपंचायतींनी चर अथवा नाली खोदावी असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे.
“नैसर्गिक उतार जिकडे जात असेल तिकडे पाणी काढून देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने करणे आवश्यक आहे.तसेच यापुढे जिथे पाणी साचते आहे तेथून नैसर्गिक उतार असलेल्या भागातून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी.अतिक्रमण,नाली बुजवणे तसेच चर बंद करणे यामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते असून गावातील पदाधिकारी व प्रशासनातील कर्मचारी यांनी नागरिकांशी संवाद साधावा व पाणी काढून देण्याचा उपाय काढावा”-सचिन सूर्यवंशी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.
राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला आहे.त्यामुळे खरिपाची पिके हातातून निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनेक शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे.तसेच ग्रामपंचायत हद्दीत पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे.त्यासाठी नागरिकांना त्यांनी काही निर्णायक सूचना केल्या आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”नैसर्गिक उतार जिकडे जात असेल तिकडे पाणी काढून देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने करणे आवश्यक आहे.तसेच यापुढे जिथे पाणी साचते आहे तेथून नैसर्गिक उतार असलेल्या भागातून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी.अतिक्रमण,नाली बुजवणे तसेच चर बंद करणे यामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते आहे.असे निदर्शनास आल्यास संबधित सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,गावांतील प्रतिष्ठित नागरिक,सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी,तलाठी,ग्रामसेवक यांनी नागरिकांशी संवाद साधावा.गरज पडल्यास नोटीस द्यावी आणि कायदेशीर कार्यवाही करावी.आपल्या सज्ज्यातील गावामध्ये जिथे कुठे नेहमी अशी समस्या निर्माण होत असेल तिथे संबंधित यंत्रणांनी नकाशा तयार करून पाण्याचा निचरा होण्यासाठी ग्राम पंचायतीच्या सहकार्याने चर अथवा नाली खोदकाम करावे.चर अथवा नाली खोदण्यास अर्धा गुंठे जागेची आवश्यकता आहे.चर अथवा नाली खोदल्यास साचलेले पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहून जाईल.प्रशासन या कामासाठी नागरिकांच्या सोबत आहे. सर्वांनी या कामी पुढाकार घेऊन आठवड्यातून एक दिवस श्रमदान करावे व आपल्या गावातील पाणी तुंबून राहण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार बोरुडे व कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी शेवटी केले आहे.