कोपरगाव तालुका
शासनाने नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी )
मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे वफळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरुन अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे शासन पातळीवरुन तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे.
“कोपरगांव तालुक्यातील ओढ्या नाल्यावरील छोटे मोठे के.टी.वेअर्स,शेततळी,गांवतळी तसेच शेतातील चर तुडुंब भरुन वाहत आहेत. उभ्या शेतपिकांसह जमिनी पाण्याखाली गेल्याने शिवारे जलमय झाली आहेत.काढणीला आलेले सोयाबीन,मका,कापूस,बाजरी,तूर,उडीद,मूग,भूईमूग पिके वाया गेली आहेत”-राजेश परजणे,जिल्हा परिषद सदस्य,अ,नगर.
कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलेल्या निवेदनातून परजणे यांनी कोपरगांव तालुक्यात अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.कोपरगांव तालुक्यातील ओढ्या नाल्यावरील छोटे मोठे के.टी.वेअर्स,शेततळी,गांवतळी तसेच शेतातील चर तुडुंब भरुन वाहत आहेत. उभ्या शेतपिकांसह जमिनी पाण्याखाली गेल्याने शिवारे जलमय झाली आहेत.काढणीला आलेले सोयाबीन,मका,कापूस,बाजरी,तूर,उडीद,मूग,भूईमूग पिके वाया गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, कपडे, मुलांची पुस्तके, वह्या अशा संसारोपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार यामुळे उघड्यावर पडले आहेत. आधारासाठी जागा नसल्याने अनेकांना उघड्यावर पावसात जीवन व्यथीतकरण्याची वेळ आली आहे. जनावरांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.
अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरुच्या बागा कोलमडून पडल्या आहेत.भाजीपाला पिके अक्षरश: सडून गेली आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करुनही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास अचानक हिरावल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला असताना बऱ्याच शेतकऱ्यंना अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मागील वर्षीच्या नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. तरीही कर्जे काढून यंदा शेतीचे नियोजन केलेले असताना अतिवृष्टी आणि पुरामुळे पुन्हाशेतक-यांना संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. या आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिकसंकटात सापडले आहेत. त्यांना आर्थिक मदतीशिवाय पर्याय राहिलेला नाही.
नुकसान झालेल्या शेती पिकांचे,फळबागांचे तसेच उद्ध्वस्त झालेल्या घरांचे तालुका कृषीविभाग,महसूल विभाग,गटविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याबाबत सूचना देवून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशीही मागणी परजणे यांनी केली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,कृषी मंत्री,महसूल मंत्री यांनाही पाठविल्या आहेत.