कोपरगाव तालुका
लम्पी व्हायरल आजारावरील पोल्ट्रीका औषध ट्रायल बेसेसवर लाँच
न्यूजसेवा
कोपरगांव-(प्रतिनिधी)
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुजन्य संक्रमणाचा प्रादुर्भाव पसरलेला असताना आता जनावरांमध्येही लम्पी व्हायरल डिसीज आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.या आजाराला पायबंद घालण्याच्यादृष्टीने ब्रॉड स्प्रेक्टम अॅन्टीव्हायरल प्रॉपरायटरीज मेडिसीन ( पोल्ट्रीका ) हे औषध ट्रायल बेसेसवर नुकतेच गोदावरी खोरे नामदेवराव परजणे दूध संघाच्या कार्यस्थळावर लाँच करण्यात आले आहे.
“लम्पी व्हायरल डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रॉड स्प्रेक्टम अॅन्टीव्हायरल प्रॉपरायटरीज मेडिसीन ( पोल्ट्रीका ) हे औषध ट्रायल बेसेसवर सुरु करण्यात आले असून त्याचा चांगला परिणाम दिसून आल्यास भविष्यात पशुधनाच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून देण्याचा संघाचा विचार आहे”-राजेश परजणे,गोदावरी परजणे दूध संघ,कोपरगाव.
संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,अश्वमेध मेडिकेअर प्रा.लि.चे ॲग्रो मेडिसीन एक्सपर्ट डॉ.ज्ञानेश्वर वाकचौरे,कोपरगांव तालुका पशू लघुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अजय थोरे,पशुधन विकास अधिकारी डॉ.दिलीप दहे,बायफचे विभागीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जिगळेकर, संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे,डॉ.समर्थ वाकचौरे यांच्या हस्ते पोल्ट्रीका औषध लाँच करण्यात आले.
लम्पी व्हायरल डिसीज आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी सांगितले.लम्पी व्हायरल डिसीज हा आजार प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना ( गाई, वासरे, कालवडी, बैल ) होणारा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणुमुळे हा आजार बळावतो, देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या आजाराला लवकर बळी पडतात.विषेशतः चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, वेगवेगळे किटक यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांपर्यंत पोहोचतो. परिणामी प्रजनन आणि दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. हा आजार झुनोटीक प्रकारातील नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही.त्यामुळे पशुपालकांनी घाबरुन न जाता
जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून औषधोपचार करुन घ्यावेत. जनावरांचे गोठे मुक्त व स्वच्छ ठेवावेत. किटक प्रतिबंधक औषधांची वेळच्यावेळी फवारणी करुन घ्यावी, निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून दूर ठेवावे अशा उपाययोजना केल्यास रोगाचा संसर्ग टाळण्यास चांगली मदत होऊ शकते.या आजाराचे संकट दूर करण्यासाठी शासनाचा पशुसंवर्धन विभाग,पशुधन विकास अधिकारी तसेच बायफ संस्थेत काम करणारे कृत्रिमरेतन तंत्रज्ञ यांनी या आजारासंदर्भात पशुपालकांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.