कोपरगाव तालुका
कृत्रिम रेतनातून पशुधन वाढविण्यावर गोदावरी दूध संघाचा भर- परजणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
अनियमित पर्ज्यन्यमानामुळे आतबट्ट्यात आलेल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर असून हा व्यवसाय वाढीसाठी चांगल्या दर्जाच्या कृत्रिम
रेतन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करुन पशुधन वाढविणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
वर्तमानात दुग्ध व्यवसायात अनेक खाजगी पशुवैद्यकीय तज्ज्ञ निर्माण झालेले आहेत. परंतु अनुभवाअभावी अनेकवेळा कृत्रिम रेतनाची क्रिया अयशस्वी होते. जनावरांमधील रेतनाची वेळ ओळखण्यात होणारी चूक, अयोग्य पध्दतीने रेतमात्रेची हाताळणी,रेतन करताना अयोग्य ठिकाणी ते सोडणे, रेतमात्रेचे आयुर्मान संपलेले असतानाही त्याचा वापर करणे अशा बाबींमळे गर्भधारणा होण्याचे प्रमाण अत्यल्प असते.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघ आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने कोपरगांव व राहाता तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे
शासकीय, निम शासकीय अधिकारी, खाजगी क्षेत्रात काम करणारे पशुवैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचारी यांच्यासाठी संघाच्या कार्यस्थळावर चर्चासत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय थोरे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे उप-संचालक डॉ. राहूल त्रिपाठी,
राहुरीचे डॉ. एस. आर. पाटील, डॉ. निलेश लगड, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे प्रकल्प समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर, कोपरगांव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, सौ. एस.एम. काटे, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. राहूल त्रिपाठी यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि, कृत्रिम रेतन हे कमी वेळात आणि अत्यंत किफायतशीर पध्दतीचे असून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी ते एक वरदान आहे. कृत्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरुन अधिक दूध देणाऱ्या नवीन गाई – म्हसींची पैदास करता येते. गाईंमध्ये जर्सी, होल्स्टिन, फ्रिजीयन आणि म्हसींमध्ये मुर्हा, सुरती, जाफराबादी, पंढरपुरी या जाती अधिक दूध देणाऱ्या आहेत.कृत्रिम रेतनामुळे ब्रुसेलोसीस, टी. बी., ट्रायकोमिनियासीस यासारख्या भविष्यात होणाऱ्या आजारापासून जनावरांचा बचाव आपण करु शकतो. अननुभवी तज्ञामुळे काही वेळा जनावरांच्या आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी गोपालकांनी अनुभवी तज्ज्ञांकडून रेतन प्रकिया करुन घेणे गरजेचे असते. असे सांगून श्री परजणे यांनी गर्भ प्रत्यारोपनाचाही एक लक्षवेधी उपक्रम राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि गोदावरीच्या संयुक्त सहकार्याने राबविण्याचा मानस असल्याचेही सांगितले. यावेळी डॉ. सुनील तुंबारे, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अजय थोरे, डॉ. निलेश लगड, डॉ.दिलीप दहे यांनीही मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी रेतन उपक्रमात येणाऱ्या विविध अडचणी विषद केल्या. पशुसंवर्धन विभागाच्या सिमेन स्टेशनकडून रेतन कांड्या माफक दरात मिळाल्यास त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता येईल अशी मागणी केली.