कोपरगाव तालुका
सोमैय्या महाविद्यालयात गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड अर्थात सेक्युरिटीज अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
त्या कार्यशाळेचे आयोजन सेबीच्या इन्व्हेस्टमेंट अवरेनेस प्रोग्राम या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी सेबीचे अधिकृत मार्गदर्शक डॉ.रवी अहुजा, पुणे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचा हेतू हा सामान्य नागरिकांनी गुंतवणूक करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने गुंतवणूक करावी यासंदर्भात जनजागृती करणे हा आहे असे डॉ.रवी अहुजा यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव होते.प्राचार्य यादव यांनी सेबी व वाणिज्य विभाग यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व समाजातील विविध स्तरातील गुंतवणूकदारांना याचा फायदा होईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाची रूपरेखा आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख. डॉ. संतोष पगारे यांनी केले. डॉ. पगारे यांनी वाणिज्य विभागाची ओळख तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. अहुजा यांनी आपल्या व्याख्यानात सेबीच्या इन्व्हेस्टमेंट संदर्भातील महत्वाच्या संकल्पना अतिशय सोप्या भाषेत विशद केल्या. यामध्ये गुंतवणूक करतांना घ्यावयाची काळजी, गुंतवणुकीचे विविध पर्याय, गुंतवणूक करतांना कोणत्या बाबी तपासल्या पाहिजे,त्यासंदर्भात असणारी सेबीची हेल्पलाईन नंबर,भागबाजार मधील विविध पर्यायांचा वापर करतांना घ्यावयाची दक्षता, यावर अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले.यामध्ये डिमॅट अकाउंट कशापद्धतीने वापरावे याची माहिती दिली. परंतु हे मार्गदर्शन करत असतांना कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे या उपस्थित्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सेबी असे कोणत्याही कंपनीचे शेअर्स घ्यावेत हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करत नसून सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक कशी करावी हे समजावून सांगणे हे सेबीची सामाजिक दायित्व आहे व ह्या कार्यक्रमाच्या प्रयोजनांमागचा हेतू आहे हे डॉ.रवी अहुजा यांनी आवर्जून सांगितले.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक मान्यवरांच्या गुंतवणूक संदर्भात प्रश्नांची उत्तरे डॉ.अहुजा यांनी दिली आहे.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी,माजी विद्यार्थी,पालक अशा एकूण २१० जणांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आभार डॉ.संजय अरगडे यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.रवींद्र जाधव यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी चे समन्वयक प्रा.विजय ठाणगे,कार्यालयीन अधिष्ठाता डॉ.अभिजित नाईकवाडे,डॉ.गणेश चव्हाण,डॉ.शैलेंद्र बनसोडे,डॉ.सुनील कुटे,प्रा.खोसे,प्रा.अजित धनवटे,प्रा.वर्षा पाचोरे व प्रा.पूजा कापसे यांनी प्रयत्न केले.