कोपरगाव तालुका
कोल्हे गटाचा अद्यापही रस्ते विकासाला खोडा कायम!
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सुमारे २८रस्त्यांच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कलम ३०८अन्वये हिरवा कंदील दिलेला असतानाही काल पुन्हा कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आपल्या नेत्यांचे बाहुले बनून ही विकासकामे करू नयेत असे लेखी पत्र मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना देऊन आपले शेपूट वाकडेच असल्याचे दाखवून दिल्याने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व नगराध्यक्ष विजय वहाडणेंसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
“जिल्हाधिकाऱ्यांनी कामास हिरवा कंदील दिला असताना पुन्हा काल कोल्हे गटाने सदरची कामे करू नका असे लेखी पत्र नगरपरिषदेला दिले आहे. कोल्हे गटाने जनाची नाही तर निदान मनाची तरी ठेवावी.इतके किळसवाणे राजकारण करून शहराचा विकास थांबवू नये.संजीवनीवर पत्र तयार करून त्यावर बिचाऱ्या नगरसेवकांना सह्या करायला लावून स्वतःचे राजकारण साधायचे असून हे किती काळ चालणार आहे?-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात आपल्याच प्रभागातील रस्त्यांची २८ कामे नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या विरोधात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या अपिलाचा निकाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नुकताच जाहीर केला असून त्यात कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा दावा फेटाळला असल्याने भाजप (कोल्हे गट) तोंडघशी पडला होता त्याचे पडसाद शहरभर उमटले होते व त्यावर या जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह नागरिकांनी फटाके वाजवून जोरदार स्वागत केले असताना काल कोल्हे गटाने पुन्हा एकदा आपला विकास विरोध अद्याप कायम असून नागरिकांनी कोणत्या नगरसेवकांना निवडून दिले आहे हे उघड झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की,”कोल्हे गटाने पाशवी बहुमताच्या जोरावर विकास कामे नामंजूर केली म्हणून आपण जिल्हाधिकारी,अहमदनगर यांचेकडे नगर विकास अधिनियम ३०८ कलमानुसार अपील दाखल केले होते.दोन वेळा सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अनुकूल निर्णय दिल्याने कोपरगाव शहरातील २८ कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.कामे होणार या अपेक्षेने जनतेत समाधानाचे वातावरण तयार झाले होते.
इतके सर्व घडून गेल्यानंतरही कोल्हे गटाने सदरची कामे करू नका असे लेखी पत्र दि.२८ मार्च रोजी नगरपरिषदेला दिले आहे हे विशेष! कोल्हे गटाने जनाची नाही तर निदान मनाची तरी ठेवावी.इतके किळसवाणे राजकारण करून शहराचा विकास थांबवू नये.संजीवनीवर पत्र तयार करून त्यावर बिचाऱ्या नगरसेवकांना सह्या करायला लावून स्वतःचे राजकारण साधायचे आहे हे किती काळ करणार आहेत ? तुमचेच नगरसेवक खाजगीत काय बोलतात हे जाणून घ्या.ज्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करायला तुम्ही विरोध करता ते नगरसेवक तुम्हाला दुवा देत असतील कि शिव्या याचा तरी विचार करा.
जिल्हाधिकारी साहेबांनी,दि.१६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाने बहुमताने केलेला ठराव क्र.११ स्थगित करण्याचा आदेश दि.२३ मार्च रोजी दिलेला असूनही कोल्हे गटाची सतत विरोध करण्याची खुमखुमी अद्याप कमी झालेली नाही.जनतेने काळजी करू नये अशा प्रकारच्या विरोधाला भिक न घालता विकासकामे मार्गी लागणार आहेत याची खात्री बाळगावी असे आवाहन करून जिल्हाधिकारी यांनी कलम ३०८ बाबत दिलेल्या आदेशाचा नेमका अर्थ काय हे समजून घ्यावा यंत्रणा आहे म्हणून नाहक पत्र देऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही असेही शेवटी अध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे.