कोपरगाव तालुका
शासनाने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा – परजणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात परतीचा मान्सून सुरु झाला असला तरी हा परिसर पर्जन्यछायेच्या प्रदेशात असल्याने पावसाची शक्यता कमी असल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पाण्यावाचून जनावरांचे देखील हाल सुरु झाले असून शेतकऱ्यांमध्ये काळजी दिसून येत आहे. त्यामुळे खरीप पिके व पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगांव तालुक्यासह अहमदनगर जिल्हयात वर्तमानात कुठेही पाऊस नाही. सुरुवातीच्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतक-यांनी कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग, तूर, मूग पिकांच्या पेरण्या केल्या. आतापर्यंत पिकेही तग धरुन होती. परंतु जमिनीतील ओल कमी झाल्याने खरीप पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. आठ दिवसापूर्वी हिरवीगार दिसणारी पिके आता पावसा अभावी सुकू लागली आहेत. तीन चार दिवसात पाऊस झाला नाही तर पिके वाळून जाण्याची भीती आहे. विशेषत: ऊस, डाळींब, चारा पिकेही यातून सुटलेली नाहीत. पावसाअभावी भाजीपाला पिकांचे उत्पादन घटले असून भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
विहीरी व कुपनलिकांची भूजल पातळी घटल्याने पिकांबरोबरच आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वत्र निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या खरीपाच्या आशा आता मावळल्या आहेत. पाऊस झालाच नाही तर पुढील रब्बी हंगाम धोक्यात येणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. सर्वच शेतक-यांनी उसनवारीवर बियाणे खरेदी करुन पेरण्या केल्या. तो
खर्चही भरुन निघतो की नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. जनावरांच्या चा-यांचाही प्रश्न निर्माण झाल्याने शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय देखील संकटातसापडला आहे.
कांदा उत्पादनाचा खर्चही निघून येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची आज गरज आहे. सद्या आभाळात ढग भरुन येतात परंतु पाऊस पडत नाही. कृत्रिम पावसासाठी चांगले वातावरण आहे. याचा गांभिर्याने विचार करुन शेतक-यांना संकटातून वाचविण्यासाठी कोपरगांव तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा अशीही मागणी परजणे यांनी शेवटी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.