कोपरगाव तालुका
पथविक्रेत्यांसाठी ऑनलाइन आर्थिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शहरातील पथविक्रेत्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ( पीएम स्वनिधी) योजनेची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेतुन पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेश करण्यासाठी डिजिटल साधनाचा वापर करून कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त रोख परताव्यासाठी नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.
बँकांतील व्यवहार ग्राहकांना मोबाइलच्या माध्यमातून करता येणाऱ्या सुविधेला मोबाइल बँकिंग किंवा एस.एम.एस.बँकिंग म्हणतात.कारण या सुविधेमध्ये थेट कॉल न करता एस.एम.एस.च्या सहाय्याने व्यवहार केले जातात.साधारणपणे बँका या सुविधेसाठी पैसे घेत नाहीत,एसएमएसचा खर्च मात्र पडतो.यामध्ये तुम्ही केलेला व्यवहार एसएमएसच्या माध्यमातून काही क्षणात ग्राहकाच्या मोबाइल स्क्रीनवर वाचता येतो.मोबाइल कंपन्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या बँका ही सुविधा देतात.याची माहिती फेरीवाल्यांना असणे शासनास अगत्याचे वाटत आहे.
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की,पी.एम.स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या बहुतांश लाभार्थ्यांना डिजिटल पेमेंट साधनाचा वापर करता येत नसल्यामुळे त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे बाबत अडचणी निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. याचा परिणाम सदर लाभार्थ्यांना कर्जाच्या रक्कमे व्यतिरिक्त रोख परतावा प्राप्त होण्यासाठी होत आहे. सदर बाब ही योजना अमलबजावणीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य नसल्या कारणाने पथविक्रेत्यांना डिजिटल साधनाचा वापर करणेबाबत अवगत करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे.त्या योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे आणि मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यासाठी दि.४ ते २२ जानेवारी २०२१ दरम्यान “मै भी डिजिटल” ही मोहीम राबविण्या बाबत सूचना दिलेल्या आहेत. या मोहिमे अंतर्गत पी.एम. स्वनिधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण देणे व १ रुपयाची आर्थिक दळणवळण चाचणी” करणे बाबत जिल्हा अग्रणी बँक आणि संबंधित वित्तीय संस्थेबरोबर समन्वय करून प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचा आदेश देण्यात आला होता.
या योजनेअंतर्गत दि.०६ जानेवारी रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालय येथे प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पी.एम.स्वनिधी) अंतर्गत कर्ज वितरीत झालेल्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत वितरीत केलेल्या एकूण २० लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले.सदर प्रशिक्षण देणे कामी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बँकेचे शाखा व्यवस्थापक अभिषेक कुमार उपस्थित होते.याप्रसंगी कर्ज वितरीत झालेल्या लाभार्थ्यांनी “मै भी डिजिटल” या मोहीमेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त डिजिटल आर्थिक व्यवहार करून आपला फायदा करून घेण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उपस्थितांना आवाहन केले आहे.
प्रशिक्षण यशस्विततेसाठी शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट,रामनाथ जाधव,मार्केट विभागाचे राजेंद्र गाढे,चंद्रकात साठे आदीनी परिश्रम घेतले आहेत.