कोपरगाव तालुका
..हा दूध संघ देणार आपल्या उत्पादकांना १६.६३ कोटींचा बोनस !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने आगामी दीपावली सणानिमित्त दूध उत्पादकांचे पेमेंट,परतीच्या ठेवी, वाहतुकदारांचे पेमेंट आणि कर्मचाऱ्यांसाठीचा बोनस व पगार असे सुमारे १६ कोटी ६३ लाख रुपये ५ नोव्हेंबरपर्यंत बँकेत वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दूध उत्पादकांना माहिती पुरविण्यासाठी लवकरच कॉलसेंटर सुरु करण्यात येणार आहे.संघास दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांची नोंदणी करुन त्यांना बायफ कामधेनू योजनेचे स्मार्ट कार्ड देण्यात येवून संघाकडील व बायफ कामधेनू योजनेतील सर्व सोई सवलतीचा त्यांना नाममात्र शुल्कात लाभ मिळवून देण्यात येणार आहे.प्रती १०० दूध उत्पादकांसाठी बायोगॅसची उभारणी करण्यात येणार आहे-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे तालुका सह.दूध संघ.
गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना दि.११ ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीचे पेमेंट १० कोटी ८३ लाख रुपये,परतीच्या ठेवीची रक्कम साधारणपणे ४ कोटी रुपये, संघाच्या कर्मचाऱ्यांना पगार व बोनसपोटी १ कोटी रुपये,अंतर्गत व बहिर्गत दूध वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांचे तसेच संघाला मालपुरवठा करणाऱ्या पुरवठाधारकांचे पेमेंट साधारणपणे १ कोटी अशी एकूण १६ कोटी ६३ लाख रुपये रक्कम ५ नोव्हेंबरपर्यंत बँकेत वर्ग केली जाणार आहे.
कारोना महामारीच्या कालावधीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असतानाही दूध उत्पादक शेतकरी,कर्मचारी,वाहतुकदार,संघाला मालाचा पुरवठा करणारे विक्रेते यांनी संघाशी संलग्न राहून संघाप्रती विश्वास दाखविला आहे.या सर्वांच्या सहकार्यामुळेच संघाने आपले दैनंदिन कामकाज सुरु ठेवून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून मोठा आर्थिक हातभार लावला.कार्यक्षेत्रातील दूध उत्पादन वाढण्याच्यादृष्टीने सॉर्टेड सिमेनचा कार्यक्रम राबविण्यात आला. संघाच्या कार्यक्षेत्रात एकूण ३५ कृत्रिम रेतन केंद्रे कार्यरत असून त्यामार्फत सॉर्टेड सिमेन रेतनाचे काम चालते.नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींची परिस्थिती विचारात घेवून संघ व बायफ संस्थेने १ नोव्हेंबरपासून सॉर्टेड सिमेनचा दर ९०० रुपयावरुन ६०० रुपये केला.दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने संघ व बायफ संस्थेने हे पाऊल उचलले आहे.संघाने सुरु केलेल्या पशुरोग निदान प्रयोगशाळेत जनावरांच्या १९ आजारांचे निदान केले जाते. याचाही चांगला लाभ दूध उत्पादकांना झाला आहे.याशिवाय कृत्रिम रेतन उपक्रम,जनावरांचे आजार,प्रयोगशाळेतून पशुरोग निदान,दुग्ध व्यवसायातील अडचणी यासंदर्भात दूध उत्पादकांना माहिती पुरविण्यासाठी लवकरच कॉलसेंटर सुरु करण्यात येणार आहे.संघास दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांची नोंदणी करुन त्यांना बायफ कामधेनू योजनेचे स्मार्ट कार्ड देण्यात येवून संघाकडील व बायफ कामधेनू योजनेतील सर्व सोई सवलतीचा त्यांना नाममात्र शुल्कात लाभ मिळवून देण्यात येणार आहे.प्रती १०० दूध उत्पादकांसाठी बायोगॅसची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी अनुदान देखील उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
दूध उत्पादक,कर्मचारी,वाहतुकदार यांनी दीपावली सणाच्या निमित्ताने मिळालेल्या रकमेचा वापर योग्य वापर करुन तसेच कोरोना संसर्गाच्या काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सणाचा आनंद साजरा करावा असे आवाहनही संघाचे अध्यक्ष श्री परजणे यांनी शेवटी केले आहे.