कोपरगाव तालुका
कोपरगावच्या अर्जुन भायभंग या संगीत दिग्दर्शकाचा उदय
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील सप्तर्षीमळा येथे रहिवासी असलेला अर्जुन भायभंग या तरुणाने अल्पावधीत संगीत दिग्दर्शनात भरारी घेतली आहे.संगीताची बालवयात आवड जोपासलेल्या अर्जुनचे शालेय शिक्षण हे सेवा निकेतन स्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण एस.एस.जी.एम.महाविद्यालय येथे झाले आहे.शालेय शिक्षण घेत असतांना संगीताची आवड म्हणून अर्जुन आनंद (अण्णा) आढाव यांचेकडे हार्मोनियम शिकत असे.पुढे एम.ई.टी.च्या भुजबळ नाँलेज सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स या नासिकच्या महाविद्यालयातून इंजिनिअरिंग पदवी संपादन केल्यानंतर अर्जुनने मुंबई येथे साउंड इंजिनिअरिंग चा विशेष अभ्यासक्रम पुर्ण केला आहे.
अर्जुनने बाँलीवुडकडे लक्ष केंद्रित केले.”झी” कंपनी सोबत त्याची पहिली सुरुवात झाली.”अशर्फी ” ही पहिली डान्स म्युझिक रेकॉर्ड प्रसिद्ध झाली आहे.नृत्य संगीतावर प्रेम करणार्या भारतीयांनी “अशर्फी” रेकॉर्ड अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. या रेकॉर्ड मधील काही गाणी देशातील डी.जे. साऊंड मध्ये वाजू लागली आहे.
दरम्यान हे शिक्षण घेत असतानाच त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरुणाईला आवडता ” सिफर राँक बँन्ड ” पथकात सहभागी झाला. सिफर राँक बँन्डने आंतरराष्ट्रीय पातळीवर रेकॉर्ड केले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील सन्मानही मिळाले आहे.देश-विदेशातील अनेक रसिकांना या बँन्डने मोहिनी घातली असून अनेकांची मने जिंकली आहे.
स्वतःच्या ईच्छा शक्ती बळावर अर्जुनने ड्रमर,गिटार,पियानो,बेस या वाद्य वादनाचे ज्ञान आत्मसात केले आहे.मुंबईतील बीट फँक्टरी इन्स्टिट्यूट संगीताची आवड असणाऱ्यांना तसे शिक्षण देण्यास सुरुवात केली.या माध्यमातून अर्जुनने हजारो विद्यार्थ्यांना संगीताचे व्यवसायीक शिक्षण दिले असून आजही तो देत आहे. सध्या तो “बीट फँक्टरी अँकेडमी” या संस्थेचा प्रमुख आहे.संगीता विषयी विशेष रुची असणाऱ्यांसाठी अर्जुनने मोफत कार्यशाळा घेतल्या आहे.भविष्यातील वाटचाली विषयी मार्गदर्शन केले.
अर्जुनने संगीत दिग्दर्शन केलेला हिंदी चित्रपट “हलाहल” २१ सप्टेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर,बरुन सोबती या दिग्गज अभिनेत्यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. “हलाहल” चे कथानकही आगळेवेगळे असून मुलीच्या मृत्यूचा बोध घेणाऱ्या जिद्दी व शोकाकूल वडील (सचिन खेडेकर) चा अभिनय सुंदर आहे.हे कथानक उत्तर प्रदेश या काल्पनिक राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय मधील प्रवेश प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकणारे आहे.अर्जुनचा “हलाहल” EROS NOW , Jio Cinema, Airtel Xtream यावर पहाता येणार आहे.
बाँलीवुड मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करतांना अर्जुनने इतरही मोठ्या प्रोजेक्टला संगीत देण्याचे काम सुरु ठेवले आहे.”झी म्युझिक” कंपनीसारख्या दिग्गज संस्थेसोबत काम करतांना अर्जुनने ‘झी’साठी ‘अशरफी’ नावाने डान्स म्युझिक रेकाँर्डस तयार केली.तसेच त्याने संगीत बध्द धारावाहिक मध्ये तरुणांसोबत रसिक प्रेक्षकांना आवडलेल्या काँलेज रोमान्स(नेटफ्लिक्स),भूतपूर्व(Zee 5), ब्रोचारा(Dice Media) अशा अनेक सिरीयल्सला अर्जुनने आपल्या जादुई संगीताने प्रसिध्दीच्या लाटेवर आणले आहे.सीरीज मधील त्याची गाणी लाखो प्रेक्षकांपर्यंत यु ट्युब,स्पाँटीफी,गाना,सावन अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली आहेत.त्याच बरोबर अर्जुनने अनेक नामांकित कंपनीच्या जाहिरातीला संगीत दिले आहे.
अर्जुन.गोदावरी तीरावर वसलेल्या कोपरगांव येथे लहानचा मोठा झालेले.पाटबंधारे अभियंता व ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे माजी अध्यक्ष दिवंगत सी.आर.भायभंग तथा दादांचा नातू आहे.तसेच अर्जुनचे वडील सुरेंद्र भायभंग कृषी तंत्रज्ञ असून भायभंग कृषी सेवा केंद्राचे संचालक आहेत.तर आई राधिका ह्या एम.ए.मराठी पदवीधर असून गृहीणी आहेत.अर्जुन समोर सध्या नामांकित बँनरची कामे आहेत.ती प्रदर्शित झालेवर पुढील काळात लोकांसमोर येतीलच.कुठल्याही सांगीतिक अथवा कलेची पार्श्वभूमी नसतांना केवळ स्वसाधनेतून अर्जुनने अगदी कमी वयात बड्या बँनर्सचा संगीतकार म्हणून स्वतःच्या नावाची मुद्रा उमटविण्यास सुरुवात केली आहे.
संगीत रचनाकार अर्जुन भायभंग याचा शाल व सन्मान चिन्ह देवून माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,समर्थ भुसारे यांनी सन्मान केला आहे.याप्रसंगी अर्जुनचे वडिल (सुरेंद्र),आई (राधिका),डी.एन.मार्टचे संचालक नितीन भुसारे उपस्थित होते. नासिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनीही अर्जुनला बोलावून घेत त्याचे कौतुक केले आहे.भायभंग कुटुंबाबरोबर कोपरगांचे नाव संगीत दिग्दर्शनात उतुंग नेणाऱ्या तरुण संगीत दिग्दर्शक अर्जुन भायभंगचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.