कोपरगाव तालुका
भर पाण्यात सोयाबीन काढणीस प्रारंभ !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील अवर्षणग्रस्त तेरा गावांना यावर्षी पावसाने झोडपून काढले असून सखल भागातील खरीप पिके काढण्यास येऊनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने अखेर काकडी विमानतळाच्या दक्षिणेत सलेल्या सखल भागातील शेतकऱ्यांनी इर्जीक येऊन आपल्या सहकाऱ्यांना मदतीचा हात देऊन सोयाबीन काढणीस प्रारंभ केल्याचे चित्र आहे.
परतीच्या पावसाने काकडी विमानतळाच्या दक्षिणेस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या सखल भागातील खरीप पिके पाण्याखाली गेली आहे.त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास सोडून येता येत नाही म्हणून आता आम्ही समदुःखी शेतकऱ्यांनी एकत्र येत इर्जीक साजरी करून आमची खरीप पिके वाचविण्याचा निर्णय घेतला आहे-संजय गुंजाळ,शेतकरी काकडी.
राज्यात परतीचा पाऊस ठाण मांडून बसला असून दैनंदिन होणाऱ्या पावसाने खरीप पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून जाण्याची चिंता निर्माण झाली आहे.जमिनीत भूजल पातळी काठोकाठ झाली असून असा पाऊस जवळपास सत्तर-पंच्याहत्तर वर्षात झाला नाही असे जाणकार सांगत आहे.गत दोन वर्षात पावसाने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहे.या नंतरही पाऊस असाच सुरु राहिला तर उर्वरित खरीप पिके नष्ट होतील. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता वाढली आहे.आधीच कोरोना आजारमुळे शेती व्यवसाय अडचणीत,कांदा निर्यात बंदी असताना आता सुरु असलेल्या सततच्या पावसाने हातात आलेले सोन्या सारखे पीक पाण्यात सापडल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे.बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणी केली आहे.पहिलेच डोक्यावर बँकेचे कर्ज असताना नवीन कर्ज काही शेतकऱ्यांना न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी उसनवर,सावकार या घटकांकडून कर्ज घेऊन खरीप शेती उभी केली मात्र त्यातून उभ्या केलेल्या सोनेरी पिकाचे पावसाच्या पाण्याने नुकसान होत असल्यामुळे काही शेतकरी कुटुंब अक्षरशः डोळ्यात पाणी आणत आहे.अशा परिस्थितीत हातची खरीप पिके जाऊ देणे हे त्यांच्या जीवावर आल्याने त्यांनी स्वतःच कंबर कसली आहे.व समदुखी शेतकऱ्यांना एकत्र करत इर्जीक जाण्यास प्रारंभ केला आहे.हि पाण्यातील पिके आधी सोंगुंन बांधावर टाकायची व नंतर लागलीच पाऊस येण्याच्या आधी ती आपल्या ट्रॅक्टर किंवा बैलगाडी आदी साधनांच्या साहाय्याने आपल्या खळ्यात आणून टाकण्याची एकच गडबड उडालेली आपल्याला वर्तमानात पाहावयास मिळत आहे.