कोपरगाव तालुका
सत्तेचा उपयोग लोक कल्याणासाठी होणे गरजेचे-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सुटले पाहिजे.सत्ता कोणतीही असो त्या सत्तेचा उपयोग हा लोककल्याणासाठी होणे गरजेचे आहे. हे विचार डोळ्यासमोर ठेवून कोपरगावच्या विकासाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून रखडलेल्या पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी मढी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विकास करतांना आपलं गाव,आपला विकास हा विचार मनात ठेवून जर काम केलं तर निश्चितपणे प्रत्येक गावाचा त्या पाठोपाठ तालुक्याचा व जिह्याचा चेहरा मोहरा बदलल्या शिवाय राहणार नाही-आ.आशुतोष काळे
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रूक येथे स्मशानभूमी संरक्षक भीत व कमान,शाळा खोलीचे लोकार्पण,तसेच परिवर्तन सामुदायिक विकास कार्यक्रम अंतर्गत एच.डी.एफ.सी.बँक अर्थसहाय्य प्रकल्प कार्यान्वित संस्था कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या पाणी साठवण तळ्याचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण व विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,पंचायत समिती उपअभियंता उत्तम पवार,कनिष्ठ अभियंता दिघे,माजी सरपंच मनीषा गवळी,माजी उपसरपंच आण्णासाहेब गवळी,अर्जुन गवळी,संगीता मोकळ,संतु गवळी,चिमणराव गवळी,रामराव गवळी,प्रकाश गवळी,रमेश मोकळ ग्रामसेवक नेवगे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की,”ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विकास करतांना आपलं गाव,आपला विकास हा विचार मनात ठेवून जर काम केलं तर निश्चितपणे प्रत्येक गावाचा चेहरा मोहरा बदलल्या शिवाय राहणार नाही.जलजीवन मिशन योजनेच्या निधीतून मिळणारा निधी खर्च करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.या अटींमध्ये एक अट १० टक्के लोकवर्गणीची आहे.हि अट रद्द करावी यासाठी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून मागणी केली आहे.माजी आ.अशोक काळे यांच्या कार्यकाळात त्यांनी हि अट ना.अजित पवार यांच्याकडून रद्द करण्याची मागणी केली होती आता हि अट रद्द होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात अजून चौदा पाणी योजना प्रलंबित आहे त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.