कोपरगाव तालुका
कोपरगावच्या पूर्वभागाचे पावसामुळे नुकसान निष्पन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वभागात सोमवार दि.१५ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकत्याच पेरलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान केले होते.त्या ठिकाणी तातडीने आ. आशुतोष काळे यांनी भेट देऊन कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.त्या बाबत कृषिविभागाचे पंचनामे पूर्ण झाले असून एकूण पाच गावातील ५९६ शेतकऱ्यांचे जिरायती,बागायती खालील एकूण बाधित क्षेत्र ३८९.९६ हेक्टर असल्याचे निष्पन्न झाले असून नुकसान २६ लाख ७२ हजार रुपयांचे झाले असल्याची अधिकृत माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान या भागातील काही शेतकऱ्यांनी यंदा पाऊस वेळेवर होऊनही पेरणीस जास्त घाई केलेली आढळून आली आहे.त्यांच्या खरीप पेरणीस दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते असा संशय कृषी विभागाने व्यक्त केला होता.तो दुर्दैवाने खरा ठरला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान सुरेगाव,रवंदे मंडलात अद्याप पुरेसा पाऊस उपलब्ध नाही हा तालुका प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे व खोपडी परिसरात सोळा जून रोजी दुपारी झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून शेताचे अक्षरशः तळे होऊन बाजरी,सोयाबीन,मका,कपाशी,मुग आदी पेरणी झालेल्या जवळपास ८० ते ९० टक्के पिकांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर कांद्याच्या चाळीत पाणी शिरून साठविलेल्या कांदे पावसाच्या पाण्याने भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.धोत्रे येथील आदिवासी वसाहत व दलित वस्ती शहा वसाहतमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.अनेकांचे अन्न धान्य, कपडे महत्वाची कागदपत्रे ओले होऊन नुकसान झाले होते.या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला होता. एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आकडेवारी शासनाकडे पाठवावी.झालेल्या नुकसानीची त्या-त्या पटीत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करावे.शेतात नुकतीच पेरणी केलेले बियाणे या पावसात वाहून गेले आहेत व नागरीकांचे दैनंदिन वापराचे साहित्य देखील वाहून गेल्यामुळे मदत प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना व कृषि विभागाला दिल्या होत्या.
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सुरुक्षित स्थळी हलवून मदत करण्याच्या सूचना दिल्या.आ. काळे यांच्या सूचनेनुसार मंगळवार (दि.१६) रोजी सकाळी ८ वाजेपासूनच तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या नुकसानीच्या अकडेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.या नुकसानीच्या पाहणीचे अहवाल पूर्ण झाले असून त्यात पाच गावातील ५९६ शेतकऱ्यांचे ३८६.९६ हेक्टर जिरायती क्षेत्र बाधित झाले असून त्यांचे २६.३१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.तर बागायतीचे ३ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन त्याचे ०.४१ लाखांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.एकूण नुकसान ३८९.९६ हेक्टरचे होऊन त्यात २६.७२ लाखांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.तर फळपिकाखालील बाधित क्षेत्र नसल्याचे या पाहणीत दिसून आले आहे.