कोपरगाव तालुका
कोपरगावच्या सीमावर्ती नागरिकांनी सतर्कता घ्यावी-आवाहन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या शेजारी असलेल्या येवला तालुक्यात एकाच दिवसात १६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. अशा स्थितीत येवला तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या सीमावर्ती गावातील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी सीमावर्ती गावातील नागरिकांना एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कोपरगाव-येवला तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या धामोरी,सांगवी भुसार,रवंदे,ब्राम्हणगाव,नाटेगाव,अंचलगाव,ओगदी,करंजी,पढेगाव,कासली,शिरसगाव,सावळगाव,तीळवनी,उक्कडगाव आदी गावांना भेटी देऊन नागरिकांना येवला तालुक्यात निर्माण झालेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सावध करून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका-आ. काळे
येवला तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव-येवला तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या धामोरी,सांगवी भुसार,रवंदे,ब्राम्हणगाव नाटेगाव,अंचलगाव,ओगदी,करंजी,पढेगाव,कासली,शिरसगाव,सावळगाव,तीळवनी,उक्कडगाव आदी गावांना भेटी देऊन नागरिकांना येवला तालुक्यात निर्माण झालेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सावध करून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. येवला तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असून यापैकी बऱ्याच व्यक्ती आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. त्यामुळे सीमावर्ती गावातील नागरिकांनी आपापल्या गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या गावात परगावची व्यक्ती येणार नाही व आपल्या गावातील आजारी व्यक्ती दवाखान्यात उपचार घेण्याच्या व्यतिरिक्त इतर कामासाठी कुणीही व्यक्ती परगावात जाणार नाही याची काळजी घ्यावी. कोपरगाव तालुक्यात प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. येवला तालुक्याची परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल तोपर्यंत नागरिकांनी संयम ठेवून आपल्या घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.येवला तालुक्यातील नागरीकांचा संपर्क टाळण्याचे आवाहन करुन दिव्यांगांना किराणा वाटप,रेशन वितरण,अंगणवाडी पोषण आहार, शाळेतील पोषण आहार,आशा सेविका व आंगणवाडी सेविका यांचे मार्फत केली जाणारी आरोग्य तपासणी व ग्रामसुरक्षा दलाच्या स्थापनेचा आढावा घेवून अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.याप्रसंगी ग्रामसेवक,सरपंच,पोलिस पाटील,कृषी सहायक,आरोग्य कर्मचारी,रेशन दुकानदार आदीनीं सुरक्षित अंतराचा नियम पाळावा असेल आवाहनही त्यांनी केले आहे.