कोपरगाव तालुका
संरक्षण मंत्र्यांचे…या नेत्याने केले स्वागत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गुरुवार दि.३१रोजी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले आहे.
लोणी येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आले होते.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील काकडीच्या श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे देखील आ.काळे यांनी स्वागत केले.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी संरक्षण मंत्र्यांकडे निवृत्त सैनिकांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात,’वन रँक वन पेन्शन’ योजनेत सैन्यांतील १ जुलै २०१४ च्या आधी स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांनाच लाभ देण्यात येत असून १ जुलै २०१४ नंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आर्मीच्या सैनिकांनाही वन रँक वन पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा.शहीद जवानांच्या विधवा पत्नींना वयाच्या ६७ वर्षांपर्यंत पेन्शन देण्यात यावी. अपंगत्व आलेल्या सैनिकांना व अधिकाऱ्यांना सारखीच पेन्शन देण्यात यावी.आर्मीमधील सैनिक व अधिकाऱ्यांना समान मिलिटरी सर्व्हिस पे (एम.एस.पी) देण्यात यावा.२०१६ आधी सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांनाही २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांएवढाच एक्स ग्रुप पे देण्यात यावा आदी मागण्या त्यांनी दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,खा.सुजय विखे,आ.बबनराव पाचपुते,आ.संग्राम जगताप,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के,माजी आ.कृपाशंकर सिंह,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.