ग्रामविकास
पंचायत राज अभियान चळवळ म्हणून राबविण्याची गरज-दळवी

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू होत असून हे अभियान चळवळ म्हणून राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप दळवी यांनी आज कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

” मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून
ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वसूल करणे.हजार लोकसंख्येमागे रुपये २ लाख लोकवर्गणी गोळा करुन त्यामधून लोकोपयोगी कामे करणे.ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेणे.नागरीकांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या २७ विभागांच्या ५९२ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणे.नागरीकांच्या सर्व तक्रारी निकाली काढणे आदी कामेही करण्यात येणार आहेत”- संदिप दळवी,गटविकास अधिकारी,कोपरगाव.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या व ग्रामविकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरु करण्यास काही दिवसाचा कालखंड राहिला असून हे अभियानं राज्यात ग्रामपंचायत,पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी या वित्तीय वर्षापासून तालुका,जिल्हा,महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर राबवण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी आज दुपारी ०३ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,बबनराव वाघमोडे आदी विविध विभागाचे विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने या अभियानासाठी २९० कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.यामध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे,त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे,शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे,योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे,ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे,आरोग्य,शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.याशिवाय विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे,लोकांचे जीवनमान उंचावणेसह,नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे,आरोग्य,शिक्षण,उपजीविका,सामाजिक न्याय यामध्ये काम करणे आदी कामे अपेक्षित आहे.

या उपक्रमातून ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वसूल करणे.हजार लोकसंख्येमागे रुपये २ लाख लोकवर्गणी गोळा करुन त्यामधून लोकोपयोगी कामे करणे.ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेणे.नागरीकांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या २७ विभागांच्या ५९२ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणे.नागरीकांच्या सर्व तक्रारी निकाली काढणे.ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन त्यावर सर्व माहिती प्रसिध्द करणे.गावात सीसीटीव्ही बसविणे.गावातील पात्र लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्ड उपलब्ध करुन देणे.गावातील पात्र दिव्यांगांना ओळखपत्र मिळवून देणे.
दरम्यान यातून गाव जलसमृद्ध करणे,स्वच्छ व हरित गाव करणेसह गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुध्द पाणी पुरवठा करणे,सौर उर्जेचा वापर करुन वीज देयके शून्यावर आणणे आदी उद्दिष्ट साध्य करण्यात येणार असल्याची माहितीही गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी शेवटी दिली आहे.