शैक्षणिक
कोपरगावात गीता जयंती निमित्त १५ व्या अध्यायाचे सामूहिक पठण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने नुकतीच ‘गीता जयंती’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी श्रीमदभगवद गीतेचे पूजन संस्थेचे विश्वस्त विशाल झावरे,प्राचार्य सचिन मोरे व सागर खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे.गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे.गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे.गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे.जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे.
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो.सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला,तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून ओळखला जातो.तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम मानला जातो.त्या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे प्रथम श्रीमदभगवद गीतेचे पूजन संस्थेचे विश्वस्त विशाल झावरे,प्राचार्य सचिन मोरे व सागर खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.तर शाळेच्या शिक्षिका वैशाली लोखंडे व ऋतुजा कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गीतेतील १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठण विद्यार्थी व शिक्षकांनी केले आहे.तसेच विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करत गीतेचे महत्त्व सांगितले.अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून काही श्लोकांचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.तसेच शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या शिक्षिका पूनम सुर्यवंशी यांनी केले आहे.तर शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रद्धा शिंदे व कु.प्राची पहिलवान यांनी केले तर आभार कु.प्रबज्योतकौर नुरी हिने मानले आहे.सदर कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थ्यां आदींनी परिश्रम घेतले आहे.