शैक्षणिक
…या तालुक्यात शाळा खोल्यांसाठी निधी मंजूर

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील नवीन ०८ शाळा खोल्या बांधण्यासाठी ९६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“अहील्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन-२०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील धामोरी,डांगेवाडी,डाऊच बु.व रांजणगाव देशमुख (खालकर मळा) ह्या ४ गावातील शाळांमध्ये नव्याने ०८ नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी प्रत्येकी १२ लक्ष याप्रमाणे ९६ लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा असून यातील अनेक शाळामध्ये खोल्यांची दुरूस्तीची गरज आहे.दरवर्षी जिल्हा परिषद १० कोटींचा निधी शाळा दुरूस्तीवर खर्च करते.मात्र दुरूस्तीची यादी संपायला तयार नाही.सन -२०२४-२५ या आर्थिक वर्षात ३५३ शाळा खोल्यांच्या दुरूस्तीला,तर ३८४ नवीन शाळा खोल्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.येत्या वर्षभरात ही कामे होतील.मात्र,अजूनही ४६९ शाळा खोल्यांच्या दुरूस्तीची,तर अनेक नवीन खोल्यांची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांना पूर्ण खोल्या बांधण्याऐवजी दरवर्षी १० कोटींहून अधिक निधी केवळ दुरूस्तीवर खर्च केला जातो.त्यातून काय दुरूस्ती होते,हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे नव्या खोल्या मंजुरी होणे क्रमप्राप्त असल्याचे वारंवार दिसून आले आहे.याबाबत आ.काळे यांनी लक्ष घातले असेल तरी अद्याप जवळके सह तालुक्यात अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत त्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.परिणामी अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या परवडत नसताना खाजगी शाळांचा रस्ता धरत आहेत.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना नवीन खोल्यांची आवश्यकता असल्यामुळे याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याची दखल घेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन-२०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील धामोरी,डांगेवाडी,डाऊच बु.व रांजणगाव देशमुख (खालकर मळा) ह्या ४ गावातील शाळांमध्ये नव्याने ०८ नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी प्रत्येकी १२ लक्ष याप्रमाणे ९६ लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.त्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आदींचे आभार मानले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांना मंजूर झालेला ९६ लक्ष रुपयांचा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.यामुळे भविष्यात शाळांमधील शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल होणार आहे.उर्वरित गावातील शाळा खोल्यांना देखील लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असून त्या शाळा खोल्यांना देखील निधी प्राप्त होवून त्या शाळा खोल्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांसाठी ९६ लक्ष निधी मंजूर करून आणल्याबद्दल धामोरी,डांगेवाडी,डाऊच बु.व रांजणगाव देशमुख गावातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.