शैक्षणिक
…या २८ परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे आयोजन १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्यातील २८ उपकेंद्रांवर करण्यात आले आहे.परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
परीक्षेसाठी १० हजार ९४ उमेदवार बसलेले असून ७ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी,२ उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथकातील अधिकारी, २८ उपकेद्रप्रमुख म्हणून वर्ग १ चे अधिकारी,५६ सहायक,१०५ पर्यवेक्षक,४६३ समवेक्षक,९ लिपीक,२८ केअर टेकर,२८ बेलमन,५३ शिपाई,१०४ पाणी वाटप कर्मचारी आणि ३९ वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी ८.३० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे.उमेदवारांनी आयोगाने दिलेल्या सुचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.परीक्षा कक्षात मोबाईल,कॅल्क्युलेटर,डिजीटल डायरी,पेजर,मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणण्यास आणि परिक्षा केंद्र परिसरात बाळगण्यास मनाई करण्यात आले आहेत.उमेदवारांनी परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करायची आहेत.दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार नाहीत.परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामधील सर्व एसटीडी बुथ,फॅक्स,झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात यावेत,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.