शैक्षणिक
गंगागिरी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यापदी…यांची निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी).
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी महाविद्यालयातील मराठीच्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉ.उज्ज्वला भोर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.रमेश सानप हे ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर रयत शिक्षण संस्थेने प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ.उज्ज्वला भोर यांची १ जून २०२४ पासून नियुक्ती केली आहे.
प्रा.उज्ज्वला भोर यांनी पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात १५ वर्षे प्रभावीपणे सेवा केली असून तेथील परिसर व सांस्कृतिक वर्तुळातही आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे.पाथर्डी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयात हुशार विद्यार्थिनी म्हणून त्या परिचित होत्या.रयत शिक्षण संस्थेत २०१० पासून त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत झाल्यानंतर लोणंद,सातारा,श्रीरामपूर येथे त्यांनी आपली सेवा बजावली आहे.
मराठी विभाग प्रमुख,मराठी संशोधन केंद्र समन्वयक,राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक,पुणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या दिंडी प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.संशोधन क्षेत्रातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने चार विद्यार्थी नेट-सेट पात्रता परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाला त्यांनी आपला दीर्घ संशोधन प्रकल्प सादर केलेला असून एम.फील.पीएच.डी.च्या मार्गदर्शक म्हणूनही त्या कार्य करीत आहेत.आजवर त्यांचे तीन विद्यार्थी एम.फील.पदवी तर चार विद्यार्थी पी.एच.डी.पदवी प्राप्तकर्ते झाले आहेत.त्यांच्या नावावर सहा ग्रंथ प्रकाशित असून पंचेचाळीसच्यावर शोध निबंध विविध नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत.२०१९ साली प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झालेली असून रयत शिक्षण संस्थेतील त्या पहिल्या महिला प्रोफेसर ठरल्या आहेत.सातारा येथे कार्यरत असताना कर्मवीर विद्या प्रबोधिनीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.त्यांनी संपादित केलेल्या ‘भरारी’ या वार्षिकांकातील लेखांना पारितोषिके मिळाली आहेत.
प्रा उज्ज्वला भोर यांच्या प्रभारी प्राचार्यपदी झालेल्या निवडीचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे,सदस्या चैताली काळे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष कोल्हे,गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,ॲड.संदीप वर्पे,सुनील गंगुले,बाळासाहेब आव्हाड,महेंद्रकुमार काले, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य कारभारी आगवन,एम.टी.रोहमारे,अरुण चंद्रे,डॉ.रमेश सानप,कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी,महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.बाबासाहेब शेंडगे,डॉ.देविदास रणधीर,नॅकचे कॉर्डिनेटर डॉ.निलेश मालपुरे, डॉ.प्रतिभा रांधवणे,डॉ.माधव यशवंत,उपप्राचार्य डॉ.वर्पे,डॉ.अर्जुन भागवत,संजय शिंदे,ज्येष्ठ प्रा.डॉ.मोहन सांगळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.