शैक्षणिक
…या शाळेत गडकिल्ल्यांची स्पर्धा संपन्न !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे व पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड अॅकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनिआर कॉलेज, वांगी-भेर्डापूर येथे दिवाळी सुट्यांच्या निमित्ताने किल्ला बनवण्याची स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते,वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात.किल्ले ही लढायांची ठिकाणं.रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत.या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा.या किल्ल्यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले होते.सुट्टीच्या वेळी अशा या किल्ल्यांना भेट द्यायलाच हवी.अशा गड किल्ल्यांनीं महाराष्ट्र भूमी संपन्न झाली असून त्यांचा मोठा प्रभाव जनमानसावर दिसून येतो.त्यामुळे शिक्षण सुरु असताना गड किल्ले लहान बालकांना माहिती असणे क्रमप्राप्त आहे.त्यासाठी विविध शाळा या किल्यांच्या स्पर्धा आयोजित करून त्याकडे या बालकांचे लक्ष वेधून घेत असतात.अशाच स्पर्धा नुकत्याच वांगी-भेर्डापूर येथे प्राईड अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मोठया उत्साहात संपन्न झाल्या आहेत.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गडकिल्ल्यांची माहिती असणारे,दुर्गप्रेमी तसेच गिर्यारोहक सचिन भांड व डॉ.रवींद्र महाडिक हे उपस्थित होते.
प्राईड अकॅडेमी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे यजुर्वेद,सामवेद,अथर्ववेद व ऋग्वेद हे चार हाउसेस (विभाग) आहेत संपूर्ण विद्यार्थी हे या चार हाउसमध्ये विभागले गेलेले आहेत.चारही विभागामध्ये बुधवार दि. ०८ ऑक्टोबर रोजी स्पर्धा घेण्यात आली.त्यात विद्यार्थ्यांनी रायगड,मल्हारगड,सिंधुदुर्ग,प्रतापगड असे विविध किल्ले बनविले आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून नियोजन करून मेहनत घेतली होती.या संपन्न झालेल्या या स्पर्धेसाठी वांगी-भेर्डापूर येथील बरेच पालक,शिक्षक,शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.महाडिक म्हणाले की,सदर किल्ल्यातील हुबेहूबपणा बघून असे वाटते आहे की साक्षात शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचे दर्शन होत आहे.श्री.भांड आपल्या प्रोत्साहनपर भाषणात म्हणाले की,”शिक्षणासोबतच आपल्या पूर्वजांच्या वास्तूंबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेला आदर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या किल्ल्यांतून दिसत आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे पालकानी मुरकुटे दांपत्याचे कौतुक केले आहे.
सदर प्रसंगी प्रथम विजेता यजुर्वेद हाउसचे प्रमुख वृषाली ताके,धनश्री पडवळ,अरुणा कांबळे,द्वितीय क्रमांक प्राप्त ऋग्वेद हाउसचे प्रमुख विद्या लोखंडे व माया नारळे तर तृतीय क्रमांक प्राप्त अथर्ववेद हाउसचे प्रमुख रेणुका बडाख व जुईता मेकडे आदींना जाहीर केले आहे.
सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या प्रिती गोटे,शिक्षकेतर कर्मचारी आदींचे मार्गदर्शन लाभले होते.