निधन वार्ता
..’त्या’ माजी नगरसेवकाचे अखेर निधन
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक व वर्तमानात राष्ट्रवादी आ.काळे गटाचे कार्यकर्ते स्वप्नील शिवाजी निखाडे (वय-३३) यांचे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिक येथे उपचार घेताना निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,एक बहिण,पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरगाव नगरपरिषद सन-२०१६ च्या नोव्हेंबर मधील निवडणुकीत भाजप तथा कोल्हे गटाकडून निवडणूक जिंकून ते विजयी झाले होते.त्यांना कोल्हे गटाने तरुण असूनही सन-२०२० मध्ये उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.मात्र नगरपरिषद कार्यकाळ संपल्यावर त्यांचे व कोल्हे गटातील दुसऱ्या फळीतील एका कार्यकर्त्यांचे बिनसले होते.त्यातून त्यांनी कोल्हे गटाचा त्याग केला होता.त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून विद्यमान आ.आशुतोष काळे यांचे समर्थक बनले होते.त्यांनी आपल्या व्यवसायात बऱ्यापैकी जम बसवला होता.मात्र अलीकडील काळात ते अत्यवस्थ असल्याच्या बातम्या होत्या.त्यातून त्यांनी दि.०७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्यां सुमारास येवला रोडवर अज्ञात कारणाने दुकानाच्या समोर आपल्याच गाडीत विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता.त्यांना त्यांच्या नजीकच्या नागरिकांनी व आप्तस्वकीयांना तातडीने आधी कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पहिले ७२ तास जोखमीचे सांगितले होते अशी माहिती आहे.त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती आहे.
दरम्यान त्यांच्या पश्चात रयत शिक्षण संस्थेचे माजी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी निखाडे हे वडील असून त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,ऍड.योगेश खालकर,साईनगर येथील चैतन्य मित्र मंडळाच्या सदस्यांनी आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांचेवर कोपरगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी ०७ च्या सुमारास अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.