निधन वार्ता
निराधारांचा आधार हरपला,सर्वत्र हळहळ !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगाला श्रध्दा आणी सबुरीचा संदेश देणा-या शिर्डीतील श्री साईबाबांनी आपल्या हयातीत अनेक वृद्ध,दिनदुबळ्या पीडितांची सेवा केली असून याच सेवेचा वसा घेवून शिर्डी शहरात निराधार वृध्दांना आधार देण्यासाठी द्वारकामाई वृद्धाश्रमाची उभारणी करून हजारो आई-वडीलांचा आधार बनलेले वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास अण्णा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी निधन झाल्याने शहरात शोककळा पसरली असून वृद्धाश्रमातील वृध्दांनी दुःख व्यक्त केले आहे.द्वारकामाई आश्रमातील निराधारांचा आधार हरपला आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६१ वर्षी होते.
शिर्डीत दक्षिण भारतातील साईभक्त स्वर्गीय श्रीनिवास व त्यांच्या पत्नी बी.सुधा श्रीनिवास यांनी निराधार वृध्दांना आधार मिळावा यासाठी शिर्डी शहरातील पश्चिम बाजूस असलेल्या कनकुरी ग्रामपंचायत हद्दीत सन २००२ मध्ये द्वारकामाई वृद्धाश्रमाची उभारणी केली.विस बावीस वर्षांत या आश्रमात हजारो वृध्दांना आधार देण्याचे कार्य या दाम्पत्यांनी केले.या दरम्यान त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.मात्र साईबाबा आमच्या पाठीशी आहे.अशी भावना सातत्याने मनी बाळगून आश्रमातील वयोवृद्धांची सेवा करण्यात धन्यता मानली होती.
आश्रमातील कार्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच शहरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या बरोबरच विविध राजकीय पक्षांच्या अनेक मान्यवर नेत्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे.आजच्या घडीला या आश्रमात राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील महिला व पुरुष मिळून सुमारे दिडशेच्या आसपास संख्या आहे.या सर्वांना दोन वेळचे जेवण तसेच नाष्टा,चहापाणी याबरोबरच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते.या आश्रमात नुकतीच आठ दिवसांपूर्वी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भेट देऊन वयोवृद्धांची चौकशी करत वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती.याठिकाणी असे अनेक वृद्ध व्यक्ती आहे की दुर्धर आजाराने त्रस्त आहे.त्यांची सेवा करणे अतिशय कठीण आहे.परंतू अशाही परिस्थितीत या दांपत्यांनी कुठेही न डगमगता अविरतपणे सेवा कार्य सुरूच आहे.साईभक्त श्री श्रीनिवास आण्णा यांना रविवार दि २ जून रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनाची बातमी शिर्डी शहरातील अनेकांना प्रचंड वेदना देणारी ठरली असल्याचे। मानले जात आहे.