नगर जिल्हा
लाडकी बहीण योजना अखंडित राबवणार-…या नेत्यांची घोषणा
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यात एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहणार नाही.दिवाळीपर्यंत सुमारे अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ देणार आहोत,लाडक्या बहिणींनो यापुढेही आपला आशीर्वाद कायमस्वरूपी या भावाच्या पाठीमागे असू द्या.पुढील पाच वर्ष वाढीवपणे लाभ व अखंडीतपणे लाडकी बहीण योजना राबवणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरण मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे यांच्या प्रमुख आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.तत्पुर्वी ना.फडणवीस यांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या विकास प्रकल्पांचा भुमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला.
याप्रसंगी आ.मोनिका राजळे,आ.आशुतोष काळे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, माजी खासदार डॉ सुजय विखे,माजी खा.सदाशिव लोखंडे,मा.आ.बाळासाहेब मुरकुटे,भाऊसाहेब कांबळे,विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,पोलिस अधीक्षक राकेश ओला, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,दिलीप भालसिंग,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते,नितीन औताडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”नगर नाशिक व मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे ५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी निविदा काढून प्रत्यक्ष कामास कार्यारंभ करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच सर्व काही शक्य आहे.जोपर्यंत लाडक्या बहिणींना अर्थतंत्राच्या केंद्रस्थानी आणू शकत नाही, त्यांचे सबलीकरण करून महिलांना समृद्ध व विकसित बनवत नाही,तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा विकास साधला जाणार नाही. म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव यापासून सुरुवात करून महिला भगिनींसाठी विविध लाभाच्या योजना आणल्या आहेत.ज्या वंचित असेल अशा सर्व महिला भगिनींना ऑक्टोबर महिन्यात लाभ मिळणार असल्याचे सुतोवाचे यावेळी त्यांनी केले.राज्यातील एकही बहीण आमच्या भावांकडून अर्थात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या दिवाळीच्या ओवाळी पासून वंचित राहणार नाही अशी खात्री यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.विरोधकांचा समाचार घेतांना लाडकी बहीण योजना सभागृहात पास केली तेव्हा विरोधक एक ना अनेक आरोप करत होते एवढेच नव्हे तर लाडकी बहीण योजना पैशाचा अपव्यय व चुराडा करणारी आहे असा डंका पिटवत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात याचिक दाखल केली.परंतु बहिणींनो काळजी करू नका आम्ही भारीतला भारी वकील देऊन योजना स्थगित होऊ दिली नाही.शिर्डी एअरपोर्ट येथे नवीन टर्मिनलच्या कामाचा शुभारंभ केला जाणार असून विकासाची गती अशी चालू ठेवणार आहोत.आम्हाला कुठल्याही पद व प्रतिष्ठेपेक्षा आपल्या सर्व बहिणींचे प्रेम व आशीर्वाद महत्त्वाचे आहे. हे आशीर्वादच आम्हाला ऊर्जा देत असल्याचे फडणवीस यांनी शेवटी सांगितले.
प्रास्ताविकात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,”जिल्ह्याच्या दृष्टीने देशातील भव्य असे अहिल्यादेवीचे स्मारक चोंडी येथे,तर नेवासा तालुक्यात संत ज्ञानेश्वरांचे स्मारक अर्थात सृष्टी प्रकल्प उभारण्यासाठी फडणवीस यांनी शुभेच्छा द्याव्यात त्यासाठी मान्यता द्यावी अशी विनंती त्यांनी आपल्या मनोगतात शेवटी व्यक्त केली.