साहित्य व संस्कृती
भि.ग.रोहमारे ट्रस्टचे राज्य पातळीवरील साहित्य पुरस्कार जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये संदीप जगताप (सांगोला,जि.सोलापूर),माधव जाधव (नांदेड),जयराम खेडेकर (जालना),केदार काळवणे (कळंब,जि.उस्मानाबाद),अनंता सूर (वणी, जि. यवतमाळ), इ. लेखकांचा समावेश आहे अशी माहिती रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ.गणेश देशमुख व सहकार्यवाह डॉ.संजय दवंगे यांनी येथे दिली आहे.
“वीजेने चोरलेले दिवस” ही कांदबरी सतत जाणाच्या वीजेमुळे शेती व शेतकन्याची होणारी छळवणूक,पिकांची दिवसा ढवळया होणारी राख रांगोळी,त्याचबरोबर वीजेची शहरी मक्तेदारी,मुजोर कर्मचारी वर्ग,शेतकऱ्यांच्या जिवावर जे जगतात त्यांनाच कस्पट समजणारी करत्यां-धरत्याची मनोवृत्ती इ.प्रत्ययकारी चित्रण करते. तर चिन्हांकित यादीतली माणसं या ग्रामीण कथा संग्रहातील कथा,ग्रामजीवनातील नवतरुण उदरनिर्वाहासाठी शहराकडे जातो आहे”
या प्रसंगी ट्रस्टी रमेश रोहमारे,शोभाताई रोहमारे,संदीप रोहमारे,अँड राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ. बी.एस.यादव उपस्थित होते.
भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून राज्य पातळीवर ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कांदबरी,कथासंग्रह व समीक्षा या साहित्यप्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.यावर्षी २०२० या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
वीजेने चोरलेले दिवस-संतोष जगताप (ग्रामीण कांदबरी दर्या प्रकाशन,पुणे),चिन्हांकित यादीतली: माणसं- माधव जाधव (ग्रामीण कथासंग्रह-सायन पब्लिकेशन,पुणे),मोरपीस: प्रा. जयराम खेडेकर (ग्रामीण.कविता संग्रह-उमी प्रकाशन,जालना),ग्रामीण साहित्य: संकल्पना आणि समीक्षा-केदार काळवणे (ग्रामीण साहित्य समीक्षा अक्षरबाङ्मय प्रकाशन,पुणे),काटेरी पायवाट: अनंता सूर (ग्रा. आत्मकथन अर्थव पब्लिकेशन,धुळे) प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख ११,हजार रुपये व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या वर्षी समीक्षा या साहित्य प्रकारात समाधानकारक ग्रंथ न आल्याने या प्रकाराचा पुरस्कार ग्रामीण साहित्य: संकल्पना आणि समीक्षा व काटेरी पायवाट या ग्रंथांना विभागून देण्यात आला आहे.ट्रस्टकडे आलेल्या एकूण ५२ साहित्यकृती पैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ.भीमराव वाकचौरे,प्राचार्य डॉ.भास्कर शेळके,डॉ.गणेश देशमुख,डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.संजय दवंगे यांच्या संयुक्त निवड समितीने केले आहे.वरील ग्रंथाशिवाय निवड समितीने उन्हानं बांधलं सावलीचं घर (भाग्यश्री केसकर),फरफट (छाया बेले).मातीमळण (विजयकुमार मिठे),सृजनगंध (डॉ.चंद्रकांत पोतदार),ऋतु बरवा (विश्वास बसेंकर) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड समितीने विशेष निर्देश केला आहे.
पुरस्कृत ग्रंथाबद्दल निवड समितीने म्हटले आहे की,”वीजेने चोरलेले दिवस” ही कांदबरी सतत जाणाच्या वीजेमुळे शेती व शेतकन्याची होणारी छळवणूक,पिकांची दिवसा ढवळया होणारी राख रांगोळी,त्याचबरोबर वीजेची शहरी मक्तेदारी,मुजोर कर्मचारी वर्ग,शेतकऱ्यांच्या जिवावर जे जगतात त्यांनाच कस्पट समजणारी करत्यां-धरत्याची मनोवृत्ती इ.प्रत्ययकारी चित्रण करते. तर चिन्हांकित यादीतली माणसं या ग्रामीण कथा संग्रहातील कथा,ग्रामजीवनातील नवतरुण उदरनिर्वाहासाठी शहराकडे जातो आहे.मात्र या कथांमधील रमेश,सुधाकर,नामा,सिमा विश्वास इ. तरुण शेतीकडे व एकूण समकालीन ग्रामीण वास्तवाकडे सकारात्मकतेने बघतात,त्यादृष्टीने या संग्रहातील सर्वच कथा वाचनीय असून ग्रामीण नवतरूणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.’मोरपीस’ या संग्रहातील ७७ कवितांमधून कवी खेडेकर यांनी ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे भिषण वास्तव प्रकट करीत असतानाच एकूण ग्रामीण सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे वास्तव चित्रण त्यातून अत्यंत कलात्मकपणे प्रकट होते. त्यातील ग्रामीण प्रतिमासृष्टी व सूचकताही लक्षणीय आहे.ग्रामीण साहित्य व कविता आज आशय व अभिव्यक्ती या दृष्टीने अत्यंत समृद्धीच्या पातळीवर पोहचली आहे त्याचा प्रत्यय देणारा हा संग्रह व त्यातील प्रत्येक कविता वाचकाला अंतर्मुख करणारी आहे.
‘ग्रामीण साहित्यः संकल्पना आणि समीक्षा’ या ग्रंथातून केदार केळवणे यांनी ग्रामीण साहित्याची संकल्पना स्पष्ट करून,ग्रामीण साहित्यातील स्थित्यंतरे व प्रेरणा तसेच ग्रामीण साहित्य समीक्षेच्या वाटचालीचे स्वरूप स्पष्ट करीत असतानाच साठोत्तरी चळवळी व ग्रामीण साहित्य यांचे परस्पर संबंधही अधोरेखित केले आहेत.तर ‘काटेरी पायवाट’ हे अनंता सूर यांचे ग्रामीण आत्मकथन विदर्भाच्या एका खेडयातील व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाची शिक्षणासाठी काटेरी पायवाट तुडवत,संघर्ष करीत जिद्दीने यशस्वी झालेल्या तरुणाची आत्मकहाणी असून ती आजच्या ग्रामीण पिढीला अत्यंत प्रेरणादायी आहे.त्यामुळेच वरील ग्रंथाची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
कै.के.बी.रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो.ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना प्रोत्साहन देणे हा यामागील मूळ उदेश असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी केले आहे.
सदर पुरस्कार वितरणाचे हे बत्तीसाचे वर्ष असून पुरस्कार योजनेचे तेहतीसावे वर्ष आहे.आज पर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील एकशे साठ पेक्षा जास्त लेखकांना सन्मानीत करण्यात आले आहे. या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण कोपरगावचे माजी आमदार व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै.के.बी.रोहमारे यांच्या तेवीसाव्या स्मृतिदिनी ज्येष्ठ मराठी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व चित्रपट पटकथाकार डॉ.सदानंद देशमुख यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वा. के.जे.सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथे केले जाणार आहे.
या पुण्यस्मरण व भि.ग. रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास साहित्य रसिक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.संजीव कुलकर्णी व के.जे.सोमैया महाविद्यालय व के.बी.रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले आहे.