कोपरगाव तालुका
बाल आनंद मेळाव्यात व्यवहार ज्ञानात वाढ-साळवे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
बाल वयातच मुलांना शिक्षणाबरोबरच सामाजिक सांस्कृतिकतेचे धडे गिरवत असतांना व्यावहारिक आणि आर्थिक ज्ञान मिळणे देखील महत्वाचे असते. यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ पोपट साळवे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव केंद्रात समाविष्ट होणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरबाग शाळेचा “बाल आनंद मेळावा” नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. त्यावेळी ते बोलत होते. या बाल आनंद मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीनाथ गांगुर्डे हे होते.
सदर प्रसंगी आलेल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तूंची खरेदी केली. विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेला विविध प्रकारचा भाजी पाला, चॉकलेट, बिस्किटे, पापड, पेरू, सीताफळ, सफरचंद आदींचे स्टॉल लाऊन विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या वस्तूंची विक्री केली. दिवसभराच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना नफा झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात आले होते.
बाल आनंद मेळावा यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समितीचे सचिव पुनित पाटील, सहशिक्षक संतोष जाधव व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्याला विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून खरेदी केली.