कोपरगाव तालुका
शिर्डीतील ग्राहक मंचाने शिक्षकास मिळवून दिला न्याय !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
शिर्डी हे आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले असल्याने आता ते खिशेकापू,आणि फसविणारांची राजधानी म्हणूनही आता प्रसिद्ध होण्याची स्थिती निर्माण झालेली असताना येथील ग्राहक संरक्षण मंचने मात्र एका श्रीराम यात्रा कंपनीकडून ४५ हजारांची फसवणूक झालेल्या शिर्डीत शिक्षक असलेल्या सयाजी ढमढेरे यांना मदत करून या फसवणुकीला आळा घालायचे मोलाचे काम केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने 24 डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात आले मात्र अद्याप ग्राहक मात्र त्या बाबत अनभिज्ञच असल्याचे दिसून येत आहे.
अनेक कंपन्या आपल्या ग्राहकाना स्वस्त मालाचे गाजर दाखवून वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींद्वारे आपला कमी किंमतीचा माल ग्राहकांच्या माथी मारला जातो. आजच्यासाठी खास कमी केलेली किंमत असेही गाजर ग्राहकांना दाखवून वस्तु ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. काही व्यापारी तर खरेदीची साखळी योजना आखून आपल्या वस्तूचा खप वाढविण्याचा प्रयत्न करून ग्राहकांची फसवणूक करतात.काही प्रवासी कंपन्या सहलीचे विविध पॅकेज जाहीर करून ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक करतात. यातही ग्राहकांनी आपली जागरूकता दाखविली पाहिजे. मात्र असे सहसा होत नाही आणि ग्राहक बळी पडल्याचे वारवांर दिसून येत आहे.
ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देणे, त्याचे शोषण थांबविणे, ग्राहकाला त्याची गार्हाणी मांडण्यासाठी ग्राहक संरक्षण मंचाची जिल्हावार रचना करण्यात आली असली तरी बऱ्याच वेळा ग्राहक हा या अधिकारापासून अनभिज्ञ असतो त्याचा गैरफायदा काही बनेल मंडळी घेत असतात.मात्र या बाबत नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या ग्राहक मंचने नागरिक व ग्राहकांमध्ये बऱ्यापैकी जनजागृती केल्याचे आढळून येत आहे.
शिर्डीत शिक्षक सयाजी ढमढेरे यांची अशीच फसवणूक शिर्डीत श्रीराम यात्रा कंपनीने पत्रके वाटून करण्यात आली होती व त्याला ढमढेरे हे बळी पडले होते.फसवणूक झाल्यावर त्यांच्या लक्षात आले.मात्र संबंधित यात्रा कंपनी त्यांना दाद देईना अखेर त्यांनी शिवसेनेच्या ग्राहक मंचकडे धाव घेतली होती.त्यांना सेनेचे ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सिनगर यांनी मदत करून त्यांची सुमारे पंचेचाळीस हजार रुपयांची रक्कम पुन्हा श्रीराम यात्रा कंपनी कडून ऑनलाइन मिळवून दिल्याने सिनगर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सिनगर यांनी विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचेकडे या बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची मागणी केली आहे.