मनोरंजन
चूको मत चौहान..चलावो बाण…!
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अफगाणिस्तानातील काबूलच्या अंधार कोठडीत एक नर-सिंह उद्विग्नपणे येरझाऱ्या घालीत होता…. ज्या हातांतील तलवारीने शत्रूंच्या टोळधाडीला पळता भुई थोडी करून चारीमुंड्या चीत केले होते तेच हात साखळदंडांनी करकचून बांधले गेले होते… पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या पायात भारी भक्कम बेड्या टाकून त्यांना जायबंदी केले गेले होते…. त्याच्या फोडल्या गेलेल्या डोळ्याच्या खोबणीत आजही प्रतिशोधाचा अंगार प्रज्वलित होता… अशा या बहाद्दर वीराचे नाव होते “हिंदशिरोमणी पृथ्वीराज चौहान”!
चार बांस,चोवीस गज आणि आठ वित एव्हढ्या उंचीवर सुल्तान बसला आहे.तेव्हा राजे चौहान. कोणतीही चूक न करता तू नेम साधून आपले लक्ष्य साध्य कर! या सांकेतिक बिरुदावलीतून पृथ्वीराजांना मोहम्मद घौरीच्या बसण्याच्या अंतराचा अचूक अंदाज घेतला आणि घौरीचा निशाणा साधला.
अजयमेरूच्या (अजमेर) या राजपूत वीराने परदेशी इस्लामिक आक्रमक मोहम्मद घौरी ला सोळा वेळा पराभूत केले होते आणि प्रत्येक वेळी उदारपणा दाखवत त्याला जिवंत सोडले, परंतु सतराव्या वेळेस त्यांचा पराभव झाला, तेव्हा मोहम्मद घौरी ने त्यांना सोडले नाही. त्याने त्यांना बंदिवान करून काबुल-अफगाणिस्तानात नेले. सोळा वेळेस पराभूत झाल्यावर ज्या घौरीने दया म्हणून प्राणाची भीक मागितली तोच घौरी बंदी केलेल्या पृथ्वीराजांवर आसूड ओढत होता आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी अनन्वित छळ करीत होता. “प्राण गेला तरी बेहत्तर पण इस्लाम स्वीकारणार नाही” असे म्हणून डोळ्यास डोळा भिडवणाऱ्या पृथ्वीराजांचे डोळे फोडण्यात आले होते!
पृथ्वीराजांचा इमानी राजकवी “चंद बरदाई”, आपल्या राजाला, पृथ्वीराजांना भेटायला थेट काबूलला पोहोचला! तेथील कैदेत असताना पृथ्वीराजांची दयनीय अवस्था पाहून चंद बरदाईच्या मनाला तीव्र धक्का बसला… आपल्या राजाचे असे हाल करणाऱ्या घौरीचा त्याने सूड घेण्याचे ठरवले… आपली योजना त्याने आपल्या राजांना सांगितली आणि विनंती केली कि, “हे राजा, आपण या घौरीला इतकेवेळा माफ केले, पण आता या सापाच्या अवलादीचा वध करण्याची वेळ आली आहे!”
चंद बरदाई घौरीच्या दरबारात आला…. त्याने घौरीला सांगितले की, “आमचा राजा एक महाप्रतापी सम्राट आहे… तो एक महावीर योद्धा तर आहेच पण माझ्या राजाची तुला अवगत नसलेली एक खासियत म्हणजे, आमचे राजे ध्वनी-लक्ष-भेदनात प्रवीण आहेत! नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण चालवून अचूक सावज टिपण्यात ते तरबेज आहेत! जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच्या शब्दभेदी बाणांची अद्भुत कामगिरी स्वतः पाहू शकता!
यावर घौरीचा विश्वासच बसेना, तो म्हणाला, “अरे, मी तर तुझ्या राजाचे दोन्ही डोळे फोडले आहेत… मग तो आंधळा कसा काय धनुष्यबाण चालवणार?”
चंद बरदाई अदबीने उत्तरला, “खाविंद, तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष ही विद्या पाहू शकता… माझ्या राजांना इथे दरबारात बोलवा… काही अंतरावर लोखंडाचे सात तवे ठेवा…. आणि त्यांचा आवाज करायला सांगा…. माझे राजे आपल्या धनुष्यबाणाने त्या सातही तव्यांचे भेदन करतील!”
घौरी कुत्सितपणे हसला नि म्हणाला, “तू तर फारच प्रशंसक आहेस तुझ्या राजाचा! पण एक लक्षात ठेव…. जर का तुझा राजा हि कला दाखवू शकला नाही, तर त्याच दरबारात मी तुझे आणि तुझ्या राजाचे डोके उडवून लावीन!”
चंद बरदाईने घौरीची अट मान्य केली आणि बंदिगृहात आपल्या लाडक्या राजांच्या भेटीला आला. तिथे त्याने पृथ्वीराजांना घौरीसोबत झालेली बातचीत सांगितली, दरबाराची सविस्तर मांडणी विशद केली आणि दोघांनी मिळून आपली योजना आखली.
ठरल्याप्रमाणे घौरीने दरबार भरवला आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आमंत्रित केले.भालदार चोपदार यांनी मोहम्मद घौरी दरबारात येत असल्याची वर्दी दिली. आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला!
चंद बरदाईच्या निर्देशानुसार सात मोठ्या लोखंडी तव्यांना ठराविक दिशेने व अंतरावर ठेवण्यात आले होते. पृथ्वीराजांचे डोळे काढून आंधळे करण्यात आले असल्याने त्यांना चंद बरदाई च्या साहाय्याने दरबारात आणले गेले. घौरीला “शब्दभेदि बाणाचे दृश्य” नीट पाहता यावे म्हणून त्याच्या उच्च स्थानासमोरील मोकळया जागेत पृथ्वीराजांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती. ते स्थानापन्न झाल्यावर त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण देण्यात आले.
चंद बरदाई घौरीला म्हणाला,”खाविंद, माझ्या राजांचे साखळदंड आणि बेड्या काढण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना आपल्या या अद्भुत कलेचे प्रदर्शन करता येईल”
घौरीला त्यात काहीच धोका वाटलं नाही कारण, एक तर पृथ्वीराज डोळ्याने ठार आंधळा.चंद बरदाई सोडला तर त्याचा कोणी सैनिक नाही. आणि माझे सारे सैन्य माझ्याजवळ दरबारात उपस्थित आहे! त्याने लगेच पृथ्वीराजांना मोकळे साकारण्याचे फर्मान सोडले.
चंद बरदाईने आपल्या परमप्रिय राजाला चरणस्पर्श करून सावध राहण्याची विनंती केली.त्याने आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या बिरुदावल्या म्हंटल्या.आणि त्याच बिरुदावलीच्या माध्यमातून चंद बरदाईनेआपल्या राजाला संकेत दिला.
“चार बांस, चौबीस गज, अंगुल अष्ठ प्रमाण।
ता ऊपर सुल्तान है, चूको मत चौहान।“
अर्थात् चार बांस,चोवीस गज आणि आठ वित एव्हढ्या उंचीवर सुल्तान बसला आहे.तेव्हा राजे चौहान. कोणतीही चूक न करता तू नेम साधून आपले लक्ष्य साध्य कर!
या सांकेतिक बिरुदावलीतून पृथ्वीराजांना मोहम्मद घौरीच्या बसण्याच्या अंतराचा अचूक अंदाज आला.
चंद बरदाईने घौरीला पुन्हा विनंती केली,” महाराज, माझे राजे हे आपले बंदी आहेत, त्यामुळे आपली आज्ञा झाल्याशिवाय ते शस्त्र चावणार नाहीत, तेव्हा आपण स्वतः त्यांना ऐकू जाईल एव्हढ्या उच्चरवाने माझ्या राजांना बाण चालवण्याची आज्ञा द्यावी”
घौरी या प्रशंसेने भारावून गेला आणि त्याने मोठ्याने उद्घोषणा केली, “चौहान चलावो बाण! चौहान चलावो बाण!!…. चौहान चलावो बाण!!!”
घौरीचा आवाज ऐकल्या बरोबर पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या धनुष्यावर चढवलेल्या बाणाची प्रत्यंचा ओढली आणि गौरीच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला नि त्या बाणाने अचूकरित्या घौरीच्या छातीचा वेध घेतला!
काय होतंय हे कळायच्या आत, “या अल्लाह! दगा हो गया” अशी किँकाळी फोडत मोहम्मद घौरीचा देह सिंहासनावरून खाली कोसळला!
दरबारात एकाच गोंधळ उडाला…. सारे सरदार हादरून गेले… तीच संधी साधून चंद बरदाई धावत आपल्या प्राणप्रिय राजाच्या जवळ आला… त्याने घौरी मृत होऊन कोसळल्याची बातमी आपल्या राजाला सांगितली. आपल्या बहादूर राजाला वंदन केले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.चंद बरदाई आणि पृथ्वीराजांना याची कल्पना होती कि, घौरी चा मृत्यू झाल्यावर त्याचे सैन्य आपल्याला छळ-छळ करून ठार मारणार. त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांवर वार करून वसंत पंचमीच्या शुभ दिवशी माता सरस्वतीला आपल्या प्राणांचे अर्घ्य दिले!
पृथ्वीराज चौहान आणि कवी चंद बरदाई यांची हि आत्मत्यागाची शौर्य गाथा आपल्या भारतीय मुलांना अभिमानाने कथन करणे त्यांच्यापर्यंत पोचणे आवश्यक आहे, म्हणून आज आपल्यासमोर एका अनाम लेखकाने लिहिलेली कथा आणली आहे.